पालघर अवतीभवतीु
सर्पदंशावरील लस रुग्णालयात उपलब्ध
विरार (बातमीदार) : आम आदमी पक्षाच्या वसई-विरार शहर जिल्हा सचिव जॉय फरगोज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. सर्पदंशावरील लस व औषधे वसई-विरार महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. जॉय फरगोज यांनी नालासोपारा (प) येथील सोपारा सामान्य रुग्णालय व पाटणकर पार्क येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस, आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे आरोग्य विभागाकडे केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी या संदर्भातील अधिकृत पत्र जॉय फरगोज यांना दिले.
महापालिकेच्या पत्रानुसार, सर्पदंशावरील लस आणि अन्य आवश्यक औषधे आता सोपारा सामान्य रुग्णालय, सर. डी. एम. पेटीट रुग्णालय, विजयनगर तुळींज रुग्णालय, श्री जीवदानी देवी रुग्णालय, बोळींज रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जुचंद्र याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे पाटणकर पार्क येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातही अत्यावश्यकतेच्या आधारावर ही लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सर्पदंशामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. ही लस वेळेवर मिळाली नाही, तर रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. आता लस उपलब्ध असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असे जॉय फरगोज म्हणाले आहेत.
-------------------------------
‘कराओके’ गायन स्पर्धेत यंगस्टार्सला प्रतिसाद
लहान गटात आराध्या तळेकर, तर मोठ्या गटात डिंपल कश्यप विजेते
विरार (बातमीदार) : जागतिक संगीत दिनानिमित्त यंगस्टार्स ट्रस्टच्या माध्यमातून कराओके गायन स्पर्धा जुने विवा काॅलेज येथे आयोजित केली होती. परिक्षक व संगीत विशारद शार्दुल कवठेकर यांनी रविवारी (ता. २९) स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
वो श्याम कुछ अजीब थी, ...सलामी इश्क, ...रैना बिती जाये, .... मधुबन में राधिका नाचे अशी एकापेक्षा एक सरस गाणी स्पर्धकांनी गायली. या स्पर्धेमध्ये १ ते १६ वयोगटात प्रथम आराध्या तळेकर, द्वितीय अथर्व गिरकर, तृतीय अद्वैका काळे, उत्तेजनार्थ पानेही कातखडे तर १७ ते ६० वयोगटात प्रथम डिंपल कश्यप, द्वितीय रोमा ढाके, तृतीय प्रशांत खरात, उत्तेजनार्थ प्रसाद पाटणकर, सौद अली, खास बक्षीस प्रेम तिवारी, संदिप महाडिक आणि ६० वर्षांवरील वयोगटात हिमांशू पंडित, द्वितीय सिंधुताई वाडेकर, तृतीय आनंद कदम अशी बक्षिसे डॉ. प्रवीण क्षीरसागर, अजीव पाटील, किरण मोंडकर, रवि पिल्ले, रमाकांत पाटील, अशरफ यांच्या हस्ते देण्यात आली.
माजी आमदार हितेंद्र ठाकूर व अजीव पाटील यांच्या दूरदृष्टीने सर्वांसाठी विनामूल्य यंगस्टार्सच्या व्यासपीठावर विविध स्पर्धांमधून अनेक कलाकार घडले नि घडत आहे हेच याचे श्रेय आहे, असे यावेळी डॉ. प्रवीण क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कुरकुरे यांनी केले तर मिलिंद पोंक्षे, मुग्धा लेले, ॲड. नयन जैन, भूषण चुरी, तानाजी पाटील, मिलिंद पवार, अक्षय मिस्री, अंजली कदम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
*******************
हिंदी सक्तीविरोधात मोर्चात सहभागी होण्याचे अविनाश जाधवांचे आवाहन
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
नालासोपारा (बातमीदार) ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये शिवसेना, सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला. विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील हॉलमध्ये रविवार (ता. २९) हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यातून ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात प्रत्येक मराठी माणसाने आपली ताकद एकवटून मराठी भाषेच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन अविनाश जाधव यांनी केले आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात मनसे पालघर लोकसभा अध्यक्ष जयंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील, विधानसभा उमेदवार वैभव मोरे यांच्यासह महिला पदाधिकारी यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते. यावेळी अविनाश जाधव यांनी मोर्चाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा समाचार घेतला असून, त्यांचा बोलविता धनी हा भाजपाचे नेते आहेत. त्यामुळे याची एवढी हिंमत वाढली आहे. हा मराठी आहे का यावर आमचा संशय आहे, असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी भाजपाला केवळ उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्यासाठी हिंदी सक्ती लादत असल्याचेही म्हंटले आहे.
*सससससससससससससससससससससससस
वाढदिवस साजरे न करता विद्यार्थ्यांना मदतीचा हात
कासा (बातमीदार) : जि. प. शाळा कैनाड मलावकर पाडा येथे वाढदिवस साजरा न करता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मिष्टान्न भोजन देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
या उपक्रमात सुरज देवनाथ पागधरे, सुवर्णा पागधरे, निलेश परब, सुनील दवणे, आनंद बारी, भूपेश तामोरे यांनी पुढाकार घेऊन निधी गोळा केला. या निधीतून प्रत्येक विद्यार्थ्याला सहा मोठ्या (२०० पृष्ठांच्या) वह्या व इतर शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेता आला.
या उपक्रमात सामाजिक कार्यकर्त्या उज्वला डामसे, कपिल डामसे, विक्रम राऊत, विनय बारी, पूनम मेस्त्री, दर्शना धानमेहेर यांसह अनेक देवदूतांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले. यावेळी उज्वला डामसे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुसंपन्न व सशक्त नागरिक बना, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, जि. प. शाळा कैनाड मलावकर पाडा, पालक वर्ग व ग्रामस्थांनी सूरज पागधरे व त्यांच्या मित्र परिवाराचे तसेच सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
**सस*स*स*स*स*स*
गुजरात गॅस पाइपलाइनच्या खोदकामात अडकतात वाहने
वाहनांचे होत आहे अतोनात नुकसान; काँग्रेसची कारवाईची मागणी
वाडा (बातमीदार) : तालुक्यातील डोंगस्ते ते वसई-विरार दरम्यान गुजरात कंपनीची गॅसवाहिनी जात असून याचे खोदकाम रस्त्यालगत करण्यात आले आहे. मात्र, काम झाल्यानंतर ते व्यवस्थितरीत्या बुजविण्यात आलेले नाही. यामुळे आता पावसाळ्यात त्यात वाहने अडकत असून त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कुडूस-देवघर हा रस्ता वर्दळीचा असून यालगतच गॅस वाहिनीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र, काम झाल्यानंतर ते व्यवस्थितरित्या बुजविण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहने त्यात अडकत असून त्यांचे नुकसान होत आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली आहे.
फोटो
*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/
‘सौर ऊर्जा जनजागृती’ उपक्रमात गोदावरी परुळेकर कॉलेजचे यश
कासा (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत, सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया व विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने सौर ऊर्जा जनजागृती कार्यक्रम शनिवारी (ता. २१) आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्ट अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून सौर ऊर्जेचा प्रसार व वापर वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे होते. यासाठी माहितीपर व्हिडिओ प्रदर्शन, प्रश्नमंजूषा स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गोदावरी परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर इशा लाडक्या जात्या हिने प्रथम क्रमांक पटकावला तर महाविद्यालयाने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावून आपली चमक दाखवली. विशेष म्हणजे, महाविद्यालयाची १०० टक्के सोलर एनर्जी अवॉर कॅम्पस म्हणून निवड करण्यात आली, ही गौरवाची बाब ठरली. हा यशस्वी उपक्रम करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक तसेच प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाविद्यालयाने सौरऊर्जा जनजागृतीमध्ये केलेले कार्य भविष्यातील हरित ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणारे ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.