थोडक्‍यात बातम्या राय-नवी

थोडक्‍यात बातम्या राय-नवी

Published on

हिंदीसक्‍तीचा आदेश मागे घेतल्याने वाशीत जल्लोष
तुर्भ, ता. ३० (बातमीदार) : राज्य सरकारने हिंदीसक्तीचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्याने वाशीत मनसेकडून जल्लोष करण्यात आला. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी (ता. ३०) मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, ढोल वाजवून, एकमेकांना पेढे भरवून मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी जल्लोष केला. या जल्लोषात सामान्य मराठी नागरिकांनीसुद्धा आपला सहभाग नोंदवला. ढोलताशाच्या तालावर नाचून मनसे पदाधिकाऱ्यांनी आपला आनंद साजरा केला, तर महिलांनी फुगडी घालून आपला आनंद व्यक्त केला. गजानन काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले. या वेळी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उप शहर अध्यक्ष अनिथा नायडू आदी उपस्‍थित होते.
.................
ऐरोलीमध्ये उच्च पदवीधरांचा सन्मान
वाशी (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १५, ऐरोली येथील माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता अशोक पाटील यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर १५ येथील हेगडे भवनमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा विशेष जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच ऐरोली सेक्टर १५ येथील दहावी आणि बारावीमध्ये सर्वाधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रभागांतील डॉक्टर, वकील, सीए अशा उच्च पदवीधरांचादेखील सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. या वेळी हेगडे भवन सभागृह पूर्ण क्षमतेने भरले होते. या वेळी आयोजक माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना ऐरोली सेक्टर १५ येथील समस्या वनंमत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडल्या. ऐरोली सेक्‍टर १५ येथील होल्‍डिंग पाँडची सुधारणा करण्यात यावी. तसेच सिडकोच्या मार्केटची दयनीय अवस्था झाली असून, त्‍याची डागडुजी करण्यात यावी. त्याचप्रमाणे तात्पुरते अग्निशामन केंद्र असणारा भूखंड हा पार्किंगसाठी राखीव आहे. या भूखंडावर मल्टिपर्पज पार्किंग उभारावे. जॉगिंग ट्रकचीदेखील दयनीय अवस्था झाली असून त्याची सुधारणा करण्यात यावी. ऐरोली सेक्टर १५ येथे आमदार फंडातून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी या वेळी पाटील यांनी केली. या वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी ऐरोलीमधील होल्डिंग पाँडची सुधारणा करण्यात येईल, असे सांगत महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवण्यात येतील, असे आश्वासन उपस्थितांना दिले.
..........
नोकरी, रोजगारासाठी मोफत प्रशिक्षण देण्याची मागणी
खारघर (बातमीदार) : येत्‍या काही दिवसांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. त्‍यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीच्या व रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पनवेल पालिका प्रशासनाने विमानतळाशी संबंधित मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावा, असे पत्र माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रालगतच लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत असून, ते लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीच्या व रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिक तरुण-तरुणींना विमानतळाशी संबंधित अद्ययावत व कौशल्यवर्धक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com