सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता वाऱ्यावर

सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता वाऱ्यावर

Published on

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : मोठा गवगवा करत ठाणे-बेलापूर मार्गावर उभारलेल्या ई-शौचालयची दुरवस्था झाल्याने नवी मुंबई महापालिकेने संपूर्ण शहरातील ई-शौचालये टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. जी स्वच्छतागृहे अस्तित्वात आहेत, ती वापरण्यायोग्य नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसह महिला व ज्येष्ठांना मोठ्या समस्येला सामोरेला जावे लागते.
ठाणे-बेलापूर मार्गावर २०१५ मध्ये या शौचालयांचे उद्‍घाटन करण्यात आले होते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांद्वारे या शौचालयांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सुरुवातीला इको-फ्रेंडली शौचालयाच्या वैशिष्ट्यांमुळे त्याचे कौतुक झाले; मात्र आता या ई-शौचालयांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय कॉइन-ऑपरेटेड बॉक्समधून पैसे चोरी केल्याच्या घटना आणि शौचालयांचा वापर बेकायदा कृत्यांसाठी केला गेल्याचेही समोर आले होते. ठाणे-बेलापूर मार्गावर असणारी काही मोजकीच स्वच्छतागृहे असून, त्यांचीदेखील दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहे आहेत, पण त्यात पाणी नाही. काही ठिकाणी वीज नाही; तर काही ठिकाणी चोरट्यांकडून साहित्याची मोडतोड करत चोरी केल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. स्वच्छता नसल्याने नागरिकांना वापर करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. यात महिलांची अधिक कुचंबणा होत आहे.
-----------------
ई-शौचालयला अल्पावधीतच टाळे
स्मार्ट सिटीअंतर्गत नवी मुंबई महापालिकेने सर्वांत आधी ठाणे-बेलापूर मार्गावरील महापे येथील ई-शौचालयचे उद्‍घाटन केले होते. त्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावर नऊ ठिकाणी लाखो रुपये खर्चून ई-शौचालय उभारले. पावणे उड्डाणपूल, महापे स्कायवॉकजवळ, एमआयडीसी कार्यालयानजीक, रिलायन्स कंपनीजवळ, तळवली नाका, रबाळे पोलिस ठाण्यानजीक, सिमेन्स कंपनी व उरण जंक्शन या ठिकाणी ई-शौचालय बसविण्यात आले होते. देखभाल दुरुस्तीअभावी, तसेच काही बेशिस्त नगरिकांच्या सवयींमुळे ई-शौचालयाला अल्पवधीतच टाळे ठोकावे लागले.

-----------------
ठाणे-बेलापूर मार्गावरील अस्वच्छ शौचालये
१. दिघा येथील सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अंतर्गत तोडफोड झाली असून, पाण्याचा अभाव आहे.
२. ऐरोली भारत बिजली या ठिकाणी असणारे ई-शौचालय बंद अवस्थेत आहे.
३. तळवळी नाका येथे असणारे शौचालयच गायब झाले असून, सध्या त्या ठिकाणी मोकळी जागा पाहायला मिळते.
४. महापे नाका येथील शौचालयाला टाळे.
५. कोपरखैरणे येथील स्वच्छतागृहाची तोफोड झाली असून, अस्वच्छता पसरली आहे.
६. पावणे पुलाखाली असणाऱ्या शौचालयाला टाळे.
७. पावणे पादचारी पुलाजवळ असणारे ई-शौचालय बंद.
--------------------
महिलांची गैरसोय
महापालिकेने टप्प्याटप्प्याने ई-शौचालये बंद केली आहेत. दुसरीकडे जी स्वच्छतागृहे सुरू आहेत, त्यात अस्वच्छता व दुर्गधी असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो; मात्र महिलांना नाइलाजस्तव त्याचा वापर करावा लागत आहे. सध्या मधुमेह, मुतखडा अशा शारीरिक व्याधींमुळे प्रवासात महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो; मात्र अस्वच्छतेमुळे अनेक जण रेल्वेस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाचा वापर करतात. तुर्भे स्थानकाबाहेर असणारे स्वच्छतागृह हे स्वच्छ असल्याने अनेक जण त्या ठिकाणी जाऊन वापर करतात.
---------------
‘युवासेना आपल्या दारी’ हा उपक्रम सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडे शौचालयाविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार आम्ही याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत. स्वच्छ भारत अभियानात पालिका स्वच्छतेला अधिक प्राधान्य देते; मात्र शौचालयाची सध्याची अवस्था पाहता पालिका स्वच्छतेच्या बाबतीत कमी पडत आहे.
- अनिकेत म्हात्रे, जिल्हाप्रमुख, युवासेना, नवी मुंबई
----------------
ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवास करताना एकही चांगले स्वच्छतागृह नाही. काही वर्षांपूर्वी ई-शौचालय उभारले, पण तेदेखील बंद आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. शारीरिक व्याधींमुळे वेळेवर स्वच्छतागृहाचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो; पण या मार्गावर प्रवासादरम्यान खूप गैरसोय होते.
- सविता पाटील, प्रवासी
----------------
नवी मुंबई पालिका हद्दीतील शौचालयांची पाहणी केली जाईल. जी स्वच्छतागृहे अस्वच्छ असतील, ती स्वच्छ करण्याचे आदेश दिले जातील व काहींची दुरुस्ती केली जाईल.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com