पुलामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुखकर
खालापूर, ता. ३० (बातमीदार) : नदीपात्रातून अंत्ययात्रा नेण्याचा व्हिडिओ गतवर्षी व्हायरल झाल्यावर तालुक्यातील उंबरणेवाडी, पिरकटवाडी, आरकस वाडीतील ग्रामस्थांचा संघर्षमय प्रवास समोर आला होता. आता ४८ लाखांचा निधी खर्चून नदीवर पूल बांधण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
निसर्गाच्या कुशीत असलेल्या मोरबे धरण परिसरातील तीन वाड्यांची लोकसंख्या जवळपास साडेसातशे आहे. सरकारदरबारी त्यांची मतदार म्हणून नोंद असली तरी मूलभूत सोयीसुविधांपासून आजही या वाड्या कोसे दूर आहेत. तीन वाड्यांपर्यंत अद्याप वीज पोहोचलेली नाही. एखादी व्यक्ती आजारी असल्यास, गर्भवती, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झोळी करून आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. पावसाळ्याचे चार महिने तर या वाड्यांचा जगाचा संपर्कच तुटल्यासारखा असतो.
माथेरानच्या डोंगरात कोसळणाऱ्या धो-धो पावसाचे पाणी धावरी नदीतून पिरकटवाडी आणि आरकसवाडीमार्गे मोरबे धरणात मिसळते. या तीन वाड्यांतील ग्रामस्थांना मुख्य बाजारपेठ, रुग्णालयासाठी चौक गाठावे लागते. पक्का रस्ता नसल्याने तसेच धावरी नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा शिधा ग्रामस्थांना भरून ठेवावा लागतो. पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर धावरी नदीवर पूल बांधण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला. पुलाचे काम पूर्ण झाल्याने तीन वाड्यांतील ग्रामस्थांना प्रवास सुखकर होणार आहे.
उंबरणे, पिरकट आणि आरकस वाडीसाठी आमदार महेश बालदी यांनी गतवर्षी पूल मंजूर करून घेतला होता, परंतु आचारसंहिता आणि त्यानंतर पावसामुळे काम करता आले नाही. आला पुलाचे काम पूर्ण झाले असून, ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.
- सुधीर ठोंबरे, भाजप नेते, चौल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.