चेंबूरमधील मुलांचे वसतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!
चेंबूरमधील मुलांचे वसतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; लवकरच खुले करण्याची मागणी
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर ता. २६ ः चेंबूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत बांधण्यात आलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाची नूतन इमारत सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नूतन वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी तातडीने खुले करावे, अशी मागणी होत आहे.
चेंबूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची एकूण २८ एकर जमीन आहे. त्यातील शासनाने एकूण १० एकर जमीन विकसकाला, तर १८ एकरमध्ये महिला व बालकल्याण सामाजिक न्याय विभागाची विविध कार्यालये, भिक्षुकरी वसतिगृह बांधण्यात आलेली आहेत. सध्या या जागेवर तालुकास्तरीय एकूण १५० मुलांसाठी संत एकनाथ वसतिगृह आहे. २५० मुलांसाठी व २५० मुलींचे माता रमाबाई वसतिगृह बांधण्यात आलेले आहे. या वसतिगृहात दीड वर्षापासून सर्व मुला-मुलींना राहण्यास दिले आहे, मात्र नूतन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. त्यामुळे वसतिगृह लवकरात लवकर उद्घाटन करून खुले करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन, आंबेडकर स्टुडंट असोसिएशन व इतर सामाजिक संस्थांनी केली आहे.
२०१८ मध्ये या वसतिगृहाच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या वर्षी २०२४ मध्ये वसतिगृहाचे काम पूर्ण झाले. या नूतन इमारतीचे उद्घाटन त्वरित करण्यात यावे, यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय सचिव कार्यालय, पुणे आयुक्त कार्यालय, प्रादेशिक बेलापूर उपायुक्त कार्यालय, सहाय्यक आयुक्त कार्यालय चेंबूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र प्रशासन जाणूनबुजून झोपेचे सोंग घेत असलयाची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
तर आम्हीच उद्घाटन करतो!
वसतिगृहाचे उद्घाटन राज्य सरकार करीत नसल्याने संतप्त विद्यार्थी संघटनेने आम्हीच उद्घाटन करतो, असा पवित्रा घेतला होता. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्यानेच उद्घाटन रखडल्याचा आरोप महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर वसतिगृहाला संरक्षण दिले आहे, असे विलास शिंदे, आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित कांबळे यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया सुरू
एक हजार मुलांसाठी वसतिगृहाची इमारत बांधण्यात आलेली आहे. नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इमारतीचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग उपनगरचे सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री प्रत्येक भाषणात सांगत असतात की हे जनतेचे सरकार आहे. आम्ही जनता आहोत. इमारतीचे उद्घाटन करण्यास त्यांना वेळ मिळत नसेल, तर आम्ही उद्घाटन करतो. त्यामुळे मुलांना राहायची सोय होईल.
- विलास शिंदे,
अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट युनियन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.