मेट्रो स्थानकांच्या नावांना विरोध
मेट्रो स्थानकांच्या नावांना विरोध
नामांतरणासाठी परिवहनमंत्र्यांचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणे आणि भाईंदर पालिका हद्दीतून धावाणाऱ्या मेट्रोच्या स्थानकांची नावे ही येथील गाव-पाड्यांचे गावपण जपणारी असावी. आगरी-कोळी समाजाची संस्कृती जपणारी हवी. म्हणूनच एमएमआरडीएने सुचवलेल्या नावांवर आक्षेप नोंदवत परिवहनमंत्री प्रताप सरानाईक यांनी काही स्थानकांची नावे बदलण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मेट्रो
४, मेट्रो ९ व मेट्रो १० मार्गातील ही स्थानके असून, सरनाईक यांची मागणी मान्य झाल्यास मेट्रो स्थानकांना ‘स्थानिक’ ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
चाकरमान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी शहरांना जोडणाऱ्या मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यानुसार मेट्रो ९ व मेट्रो १० या दोन्ही मार्गिका ठाणे व भाईंदर महापालिका क्षेत्रातून जात आहे. अशातच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ असलेल्या ओवळा-माजिवडा क्षेत्राचादेखील त्यात समावेश आहे. या मतदारसंघात अनेक गावे व आदिवासी पाडे असून, ठाणे व मिरा-भाइर्दर शहराच्या जडण-घडणीत व विकासात आगरी-कोळी समाजाचे फार मोठे योगदान आहे. या ठिकाणी सध्या मेट्रोची कामे सुरू असून, त्यांचे लवकरच लोकार्पणदेखील होणार आहे.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिक, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावे सुचविलेली आहेत. त्यामध्ये एखाद्या विकसकाने विकसित केलेल्या प्रकल्पांची नावेदेखील देण्यात आलेली आहेत. वास्तविक पाहता या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील गाव-खेड्यांचे गावपण जपण्यासाठी व आगरी-कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मूळ गावांचा तसेच आदिवासी बांधवांनी सुचविलेल्या नावांचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कारशेडच्या नावालाही आक्षेप
मेट्रो क्रमांक ९ च्या डोंगरी येथे वेलंकनी देवीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे डोंगरी कारशेडला वेलंकनी देवीचे नाव देण्यात यावे. तसेच मेट्रो क्रमांक ४ मोघरपाडा येथे पुरातन कापरादेव मंदिर असल्याने मोगरपाडा कारशेडला कापरादेव असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
एमएमआरडीऐने सुचवलेली नावे
मेट्रो-४
१) गायमुख भाईंदरपाडा २) मोघरपाडा ओवळा ३) वाघबीळ ४) कासारवडवली ५) मानपाडा ६) तत्त्वज्ञान विद्यापीठ ७) कापूरबावडी ८) माजिवडा ९) कॅडबरी जंक्शन १०) छत्रपती संभाजीनगर स्थानक ११) आरटीओ १२) तीन हात नाका
मागणी
- कॅडबरी जंक्शनऐवजी ठाणे महापालिका भवन
- तीन हात नाकाऐवजी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्थानक.
.................
मेट्रो-९
१) दहिसर २) पांडुरंगवाडी ३) मिरा गाव ४) काशिगाव ५) साईबाबा नगर ६) मेडतिया ७) शहीद भगतसिंग नगर उद्यान ८) नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक
मागणी
- मेडतिया नगरऐवजी प. पू. नानासाहेब धर्माधिकारी स्थानक
............
मेट्रो-१०
१) भाईंदरपाडा गायमुख २) रेतीबंदर ३) चेना व्हिलेज ४) वसोर्वा ५) काशिमिरा ६) दहिसर
मागणी
- रेतीबंदरऐवजी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटी
- चेना व्हिलेजऐवजी चेना गाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.