कृषी दिन थेट शेताच्या बांधावर

कृषी दिन थेट शेताच्या बांधावर

Published on

सुनील कोकरे : सकाळ वृत्तसेवा
वाणगाव, ता. ३० : वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, त्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर, शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती. या मोहिमेची दखल पुढे सामाजिक स्तरासोबतच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने, त्यानंतर शासनस्तरावरही घेण्यात आली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होत आहे.
ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत शेती, माती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रचार प्रसिद्धीमार्फत जिल्ह्यात यांत्रिकीकरण, भात ट्रे रोपवाटिका, राबविरहित भातलागवड, सगुणा तंत्रज्ञान, चारसूत्री तंत्रज्ञान, टोकन पद्धत अशा भातशेतीच्या आधुनिक तंत्राचा शेतकरी अवलंब करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक भातशेतीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भात लागवड क्षेत्रात वाढ होताना प्रामुख्याने दिसत आहे.
या दिवशी कृषी संस्कृतीचे संस्मरण करून कृषी संस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केला जातो. हा पर्व थेट बांधावर, शेत शिवारात साजरा होत असून, यात शेतकरी सन्मान, समुपदेशन, नव कृषी तंत्रज्ञानाची ओळख, फळझाडांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्यविधाते महानायक वसंंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो.


डहाणू तालुक्यात सर्वाधिक भातक्षेत्र
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये सरासरी १३ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर भातलावणी करण्यात येते. मात्र, मागील वर्षी चांगलीच वाढ नोंदवण्यात आली. तालुक्यात ११२ टक्क्यांवर हे प्रमाण गेले असून, १५ हजार ६३५ हेक्टर परिसरात लावणी करण्यात आली. जव्हार, मोखाडा आणि डहाणू तालुक्यात भात लावण्याची क्षेत्र १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगला फायदा होईल. काळानुरूप शेती करताना उत्पादन खर्च कमी होण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यावर भर दिल्यास किफायतशीर शेती करता येते.
- विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com