कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

दिंडी सजगतेची, आपत्ती व्यवस्थापनाची
कल्याण (वार्ताहर) : पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची वारी आहे. याच पवित्र वारीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ‘दिंडी सजगतेची-आपत्ती व्यवस्थापनाची’ हा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमाच्या माध्यमातून वारीतील सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्तीविषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, पथनाट्य पथक, माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल व्हॅन आणि जनतेस सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. ‘संकटाला घाबरू नका, सज्ज राहा’ असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या संकल्पनेसाठी चार चित्ररथ असून, ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झाली आहे. आषाढी एकादशीपर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.
...................
बिर्ला कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
डोंबिवली : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्र. १७ शाखेच्या वतीने शाखाप्रमुख विजय गांगण आणि कार्यकर्त्यांनी प्रभागातील बिर्ला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप केले. तसेच दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. यासोबतच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
.........................
जिल्हा परिषद शाळेला जलशुद्धीकरणाचे यंत्र भेट
डोंबिवली (बातमीदार) : जिल्हा परिषद शाळा, पिसेवाडी येथे वैशाली परदेशी यांच्या पुढाकारातून जलशुद्धीकरणाचे यंत्र भेट देण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलत वॉटर प्युरिफायर शाळेत बसविण्यात आले. तसेच यापूर्वी विद्यार्थ्यांना नेलकटर, पाण्याची बाटली, रुमाल, छत्री, कोलगेट आणि ब्रश यांसारख्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग उपस्थित होता.
...............
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : ‘अन्नदाता शेतकरी जर समृद्ध झाला तर राज्यासह देशही सुजलाम सुफलाम होईल,’ असा संदेश देणारे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात मंगळवारी (ता. १) महापालिका उपायुक्त कांचन गायकवाड आणि संजय जाधव यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महापालिका सचिव किशोर शेळके, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार आणि इतर महापालिका कर्मचाऱ्यांनीदेखील वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
..............
नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण (वार्ताहर) : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी (ता. २९) संत निरंकारी सत्संग भवन येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ सुमारे ३०२ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मिळाला. शिबिरात २१ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रियेसाठी के. बी. हाजी बच्चू अली चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई येथे पाठविण्यात आले. याशिवाय ९६ रुग्णांना तपासणीनंतर नंबर लावून चष्मे देण्यात आले. इतरांना आवश्यक त्या औषधांचा पुरवठा व डोळ्यांची निगा राखण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरात के. बी. हाजी बच्चुअली नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर्स व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या आठसदस्यीय टीमने नेत्रचिकित्सेची सेवा निभावली. प्रेमा ओबेरॉय यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच कल्याणमधील अनेक भाविकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. सेक्टर संयोजक जे. पी. उपाध्याय आणि सेवादल स्वयंसेवकांच्या सहाय्याने हे शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com