पहिल्या तिमाहीत ३६० कोटी करसंकलन

पहिल्या तिमाहीत ३६० कोटी करसंकलन

Published on

वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये कर संकलन वाढीसाठी विविध अभिनव उपक्रम राबवले आहेत. ३० जूनपर्यंत कर भरल्यास सामान्य करांमध्ये १० टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे जूनअखेरपर्यंत ३६० कोटींचा कर संकलित झाला आहे. २८ जूनपर्यंत पालिकेच्या तिजोरीत २१२ कोटींचा महसूल मिळालेला असताना उर्वरित दोन दिवसांत १३० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
महापालिकेने यावर्षी दोन लाख मालमत्ताधारकांना बिलांचे घरपोच वाटप केल्याने मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी बचत गटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या साह्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण, मालमत्ता कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ता कराबाबत शंका निरसन व बिल मिळण्यासाठी व्हॉट्सअप चॅटबॉट आणि मालमत्ता करावर १० टक्क्यांची सवलत योजना अशा विविध प्रकारच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्याने करदात्यांना कर भरणे सोईस्कर केले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. शहरातील मालमत्ताधारकांना पहिल्या तिमाहीमध्येच घरपोच बिल मिळाल्याने तसेच मालमत्ता कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीला पसंती दिल्याने कर संकलनाला गती मिळाली आहे. जवळपास ५५ टक्के लोकांनी ऑनलाइन कर भरण्याला पसंती दिली आहे.
-------------
बचत गटांच्या महिलांना रोजगार
मालमत्ता कर विभागाने मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला. बचत गटांच्या महिलांना मालमत्ता कराचे बिल वाटप तसेच मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या कामासाठी त्यांना प्रतिबिलासाठी योग्य मानधन दिल्याने महिलांना बिल वाटपातून रोजगार निर्माण होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी विभागाने दिली. यातूनच बिलांचे १०० टक्के वाटप शक्य झाले.
--------------
कमी कालावधीत जास्त कर
गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी फक्त ३० दिवसांतच निम्म्याहून अधिक मालमत्तांपर्यंत बिले पोहोचल्याने कमी कालावधीत तब्बल ३६० कोटी कर संकलित करण्यात आला. गत वर्षी जून महिन्याच्या अखेरीस २०७ कोटी कर संकलित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com