किल्ले मानगडाच्या इतिहासाला उजाळा

किल्ले मानगडाच्या इतिहासाला उजाळा

Published on

किल्ले मानगडाच्या इतिहासाला उजाळा
पेशवेकालीन नोंदी सापडल्या; ऐतिहासीक पैलू उलगडले
माणगाव, ता. १ (बातमीदार) ः दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा उपदुर्ग समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले मानगडाच्या संदर्भातील पेशवेकालीन नोंदी नुकत्याच सापडल्या आहेत. यामुळे मानगडाच्या इतिहासाचे अनेक अपरिचित पैलू उलगडले आहेत.
पुणे पुराभिलेख कार्यालयातील मोडी लिपी कागदपत्रांमधून किल्ले मानगडावर वेताळ बुरूज, गडदचा बुरूज, सबजा बुरूज, फत्या बुरूज, नगारा बुरूज असे तब्बल चौदा बुरूजांची नावे सापडल्याने शिवकाळात टेहळणीसाठी मानगडाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक तसेच मोडी लिपी अभ्यासक राज उर्फ योगेंद्र मेमाणे यांनी शोधलेल्या १७८४ मधील या नोंदीनुसार मानगडावरील इमारती सदर, दिवाणघर, चिरेबंदी कोठी, मोदीखाना (तोफखाना), बंगला, तारांगणनजीकची दिंडी, कोठी आरकसी असा उल्लेखही सापडला आहे. विशेष बाब म्हणजे मानगडावरील एका पाण्याच्या टाक्याचे नाव गंगासागर असल्याची महत्त्वपूर्ण नोंदही आढळली आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत मानगडाचा उल्लेख असून,
नव्याने उजेडात आलेल्या या पेशवेकालीन कागदपत्रांचे महत्त्व इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे, असे मत मानगड अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले.
...........
संरक्षण व्यवस्थेमधील अधिकारी
किल्ले मानगडावरील पेशवेकालीन संरक्षण व्यवस्थेमधील अधिकारी सरनोबत, सरनाईक, कारखानीस, सबनीस असे असून, त्यामध्ये सरदार तुळाजीराव पासलकर, हवालदार निम्हण आणि जनार्दन गोविंद फडणीस यांची नावेसुद्धा कागदपत्रांमधून उजेडात आली आहेत. गडावर विंझाई, भैरव आणि सबजाई या तीन देवतांची मंदिरे १७८४ मध्ये अस्तित्वात असल्याचेही या मोडी लिपीतील कागदपत्रांमधून उलगडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com