मराठी न बोलणाऱ्या दुकानदाराला मनसैनिकांकडून चोप
मराठी न बोलल्याने दुकानदाराला चोप
मनसैनिकांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; सात जणांवर गुन्हा दाखल
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मराठी न बोलणाऱ्या मिरा रोडमधील एका व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. २९) रात्री चांगलाच चोप दिला. या मारहाणीची चित्रफित समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, दुकानदाराने काशी मिरा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १) तक्रार दाखल केल्यानंतर सात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषासक्तीचा निर्णय सरकारकडून रद्द करण्यात आला. याचे मिरा रोडमध्ये मनसैनिकांनी रविवारी रात्री जल्लोष करून स्वागत केले. या वेळी मिठाई घेण्यासाठी मनसेचे उपशहर अध्यक्ष करण कांडणगिरे व इतर काही पदाधिकारी शांती पार्क भागातील एका मिठाईच्या दुकानात गेले. त्या वेळी दुकानातील कर्मचारी त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलले. त्याचा मनसैनिकांना राग आला. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठीतच बोलावे लागेल, असा दम मनसैनिकांनी कर्मचाऱ्यांना दिला.
मनसैनिकांनी त्यांना महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते, असा प्रश्न विचारला. त्यावर सर्व भाषा बोलल्या जातात, असे उत्तर दुकानाचे मालक बाबुलाल चौधरी यांनी दिले. या उत्तराने मनसैनिकांच्या संतापात आणखी भर पडली व त्यांनी चौधरी यांना जोरदार थप्पड लगावल्या. या वेळी त्या ठिकाणी आलेल्या आणखी काही मनसैनिकांनी मारहाण करणाऱ्यांना बाजला केले. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण करून समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर चौधरी यांनी मंगळवारी काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.