शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट

शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट

Published on

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेची शाळा क्रमांक एक नुकतीच अत्याधुनिक आणि सुसज्ज बांधण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक नऊमधील विद्यार्थ्यांना चिखलातून जाण्याची आणि पावसाच्या पाण्यात अभ्यास करायची वेळ आली आहे. या शाळेच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती ओल्या झाल्या आहेत. सर्वत्र अस्वच्छता असून अशा घाणीतच विद्यार्थ्यांना बसवून शिकवले जात आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच शाळेत चोरीची घटनाही घडली होती.
अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात नगरपालिकेची नऊ नंबरची शाळा सुरू आहे. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेची पटसंख्या १७५ असून बालवर्गात २८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. नगरपालिका कालावधीपासून फार जुन्या जागेत शाळा सुरू आहे. सद्यस्थितीत शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने मातीचे ढिगारे शाळेसमोर पसरले आहे. या मातीमुळे पावसात चिखल निर्माण झाला आहे. याच चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्ग काढावा लागतो. याशिवाय, शाळेच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी झिरपत असल्याने सर्व वर्गांतील भिंतींना ओलावा आला आहे. त्यात पावसाचे पाणी बाहेरून शाळेत वाहताना दिसून येत आहे. वर्गातूनच पाण्याला वाट काढून दिल्याचे पाहावयाला मिळते.
शाळेमध्ये मागील महिन्यात चोरीचा प्रकारही घडला. चोरट्यांनी लोखंडी खुर्च्या, सीसी टीव्ही कॅमेरा, संगणकाच्या आवश्यक वस्तू, याशिवाय अंगणवाडीतील मुलांना बसण्यासाठी आणलेल्या चटयाही पळवून नेल्या आहेत. एका खासगी संस्थेने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. त्याचा काही भाग पळवण्यात आला आहे. याबाबत शाळेच्या वतीने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहाचे दरवाजे चोरीला गेले असून, ते बसवून मिळावेत, अशी मागणी मुख्याध्यापक श्रीराम जोशी यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम शिवगंगानगर परिसरात सुरू आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शाळा नव्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे. शाळेची पाहणी करण्यात आली असून शाळेत भेडसावणाऱ्या समस्या त्वरित दूर करण्यात येईल. तसेच, शिक्षक, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यात येईल.
- जयश्री धायगुडे, नगरपालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी, अंबरनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com