वेसावे ते भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी
वेसावे ते भाईंदर किनारी मार्गाला गती
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी; २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : वेसावे ते भाईंदर या किनारी मार्ग प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कांदळवन वळतीकरण प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक अटींचे पालन व अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली किनारी मार्ग प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला पूल विभाग आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते. या प्रकल्पामुळे नरीमन पॉइंटपासून थेट भाईंदरपर्यंतचा प्रवास सिग्नलविरहित होणार असून, वाहतूक कोंडी कमी होऊन पश्चिम द्रुतगती मार्गावरील ताणही कमी होणार आहे. प्रकल्पाची लांबी सुमारे ६० किमी असून, तो भूभागावर व खाडी क्षेत्रातून जाणार आहे. वेसावे, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरमार्गे तो भाईंदरपर्यंत पोहोचेल. प्रकल्पात उन्नत मार्ग, पूल आणि दोन बोगद्यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२५मध्ये काम सुरू होऊन डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रवासाचा कालावधी ९०-१२० मिनिटांवरून १५-२० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. तसेच सुमारे ५५ टक्के पर्यावरणीय कार्बन उत्सर्जनात घट अपेक्षित आहे.
---
नऊ हजार कांदळ वृक्ष तोडणार
प्रकल्पासाठी ८.२४ हेक्टर कांदळवन क्षेत्र कायमस्वरूपी बाधित होणार असून, सुमारे ९ हजार कांदळ वृक्ष तोडले जाणार आहेत. याव्यतिरिक्त ६८.५५ हेक्टर क्षेत्र बांधकाम काळात तात्पुरते वळवले जाईल. महापालिकेने या हानीची भरपाई देण्यासाठी व्यापक पुनर्स्थापन योजना आखली असून, १,३७,०२५ नवीन कांदळ वृक्षांची लागवड प्रस्तावित आहे. कांदळ वृक्ष पुनर्स्थापन, जैवविविधतेचे पुनरुज्जीवन व पर्यावरण उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.
......
१०३.७ हेक्टर क्षेत्र वन विभागाला हस्तांतरित
प्रकल्पासाठी वन विकसनाची भरपाई म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात विहीरगाव येथील १०३.७ हेक्टर बिगरवन क्षेत्र वन विभागाला हस्तांतरित केले जाणार आहे. मंजुरीनंतर आता महापालिका मुंबई उच्च न्यायालयाकडे प्रत्यक्ष कामासाठी परवानगी घेणार असून, त्यानंतर प्रकल्पाचे कार्य सुरू होणार आहे. हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करण्यासाठी नव्हे, तर मुंबईच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.