बाळाला सोडून आई फरार
बाळाला सोडून आई फरार
सीवूड्स रेल्वे स्थानकातील घटना; वाशी रेल्वे पोलिसांकडून शोध सुरू
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने सामानासह लोकलमधून उतरता येणार नसल्याचा बहाणा करीत आपल्या १५ दिवसांच्या बाळाला एका तरुणीकडे सोपवले आणि स्वत: लोकलमधून न उतरता लोकलमधून पलायन केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड्स रेल्वे स्थानकात घडला. वाशी रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.
मुंबईत राहणारी दिव्या नायडू (वय १९) सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भूमिका माने या मैत्रिणीसह सीएसएमटी येथून जुईनगर येथे लोकलने प्रवास करीत होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सानपाडा स्थानक ओलांडल्यावर दोघी जुईनगर स्थानकावर उतरण्यासाठी लोकलच्या दरवाजात येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्या वेळी १५ दिवसांच्या बाळाला व तीन बॅगा घेऊन बसलेल्या एका अनोळखी महिलेने दोघींना ती सीवूडस रेल्वे स्थानकात उतरणार असल्याचे सांगितले. तसेच तिच्याकडे असलेल्या सामानामुळे तिला बाळासह लोकलमधून उतरता येणार नसल्याने त्या दोघींना तिच्यासोबत सीवूड्स रेल्वे स्थानकापर्यंत येण्यास विनंती केली.
त्यामुळे दिव्या आणि भूमिका या महिलेला मदत करण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत सीवूड्स रेल्वे स्थानकापर्यंत गेल्या. या वेळी दोघी सीवूड्स स्थानकावर बाळासह खाली उतरल्या; मात्र ती महिला न उतरता त्याच लोकलने पुढे निघून गेली. ती महिला परत येईल, असा विचार करून दिव्या आणि भूमिका या दोघी रेल्वे स्थानकात त्या महिलेची वाट पाहात बसल्या. बराच वेळ गेल्यानंतरही महिला न आल्याने त्यांनी बाळासह जुईनगर येथील भूमिकाच्या घरी जाऊन बाळाची काळजी घेतली. त्यानंतर नातेवाइकांच्या सल्ल्याने त्यांनी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजवरून महिलेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंड्रे यांनी दिली. बाळाला सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.