थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

आरसीएफ कुरूळ कॉलनीमध्ये इतरांना प्रवेश सुरू
अलिबाग वार्ताहर : तालुक्यातील कुरूळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केला होता. या प्रकारामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा बंद केलेला मार्ग पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली होती. अखेर कंपनी प्रशासनाने नागरिकांसाठी हा मार्ग अटी व नियम लावून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाठपुरावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून आरसीएफ कंपनीच्या कुरूळ येथील कर्मचारी वसाहतीचे मेन गेट स्थानिक नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. या परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, खेळाडू सायंकाळच्या वेळी वसाहतीत चालण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तसेच खेळण्यासाठी येत असतात. मात्र मेन गेट बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, खेळाडूंची गैरसोय झाली होती. याबाबत शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी वारंवार कंपनी प्रशासनाशी चर्चा करून गेट पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती, मात्र कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. गेल्या आठवड्यात खासदार सुनील तटकरे यांनीही कंपनी प्रशासनाशी चर्चा करीत शेवटचा इशारा दिला होता. अखेर नियम व अटी सांगून कंपनी प्रशासनाने स्थानिकांना प्रवेश देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. वसाहतीमध्ये प्रवेश केल्यावर सुरक्षा नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाला बंधनकारक असणार आहे. बाहेरच्या व्यक्तींना वसाहतीमध्ये वाहन घेऊन जाता येणार नाही. चालणाऱ्यांसाठी ओळखपत्र घ्यावे लागणार आहे. त्यांना वसाहतीचा वापर सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत करता येणार असल्याचे लेखी पत्र मुख्य प्रशासन व्यवस्थापकांनी दिले आहे. याबाबत शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कंपनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
................
नवनीत वाचनालयाचा ४१वा वर्धापनदिन उत्‍साहात
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नारंगी गावातील नवनीत वाचनालयाचा ४१वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती वाढावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, या हेतूने हे वाचनालय वर्षभर विविध उपक्रम राबविते. याच उपक्रमांमधील एक भाग म्हणून या वाचनालयाने वर्धापनदिनानिमित्त कविता पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते. या कविता पाठांतर स्पर्धेमध्ये राजिप शाळा, नारंगी येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थांना वाचनालयाच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी चिंतामण शिंदे, राजिप शाळेच्या मुख्याध्यापिका योजना म्हात्रे, संदेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण वाचन चळवळ आणि वाचन संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केले. या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी राजिप शाळा, नारंगीचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
.........
डॉ. नुमैरा नईम गजगे हिची अभिमानास्पद कामगिरी
श्रीवर्धन (वार्ताहर) : तालुक्यातील गोंडघर येथील डॉ. नुमैरा नईम गजगे हिला सायप्रसमधील एका प्रतिष्ठित वैद्यकीय विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. नुमैरा हिचा शैक्षणिक प्रवास अनुकरणीय राहिला आहे. तिने कुवेतमधील डॉन बॉस्को स्कूलमध्ये दहावीत ९० टक्‍के गुण मिळवले आणि डेहराडून (भारत) येथील इकोल ग्लोबल इंटरनॅशनल गर्ल्स स्कूलमध्ये बारावीच्या केंब्रिज अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण मिळवून शैक्षणिक उत्कृष्टता कायम ठेवली. टर्किश येथे नुमैराने आपले शिक्षण पूर्ण केले. सहा वर्षांच्या वैद्यकीय कालावधीत तिने शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.
............
वरसई हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप मुरूमकर सेवानिवृत्त
पेण (वार्ताहर) : पेण एज्युकेशन सोसायटीच्या पु. न. गोडसे विद्यामंदिर, वरसई शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मुरूमकर ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. या वेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. १९९१ रोजी प्रदीप मुरूमकर हे पेण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हायस्कूलमध्ये रुजू झाले. पहिल्यांदा सुपरवायझर, पीटी शिक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक यासह पतसंस्थेचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मागासवर्गीय संघटनेचे सचिव, पेण एज्युकेशन पतसंस्थेचे उपाध्यक्ष असे कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रातून ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. या वेळी शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com