दिव्यात समस्यांचा अंधार - भाग ४: प्रकल्प रखडला, खर्च दुपटीने फुगला जबाबदार कोण ?
प्रकल्प खर्चात दुपटीने वाढ
दिव्यातील रेल्वे उड्डाणपुलाची सात वर्षे रखडपट्टी
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दिवा स्थानक परिसरातील भूविवाद, अर्धवट प्रकल्प आणि जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे करदात्यांच्या पैशांचा सर्रास अपव्यय सुरू आहे. २०१९मध्ये सुमारे ३८ कोटी ९० लाख रुपयांचा दिवा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) प्रकल्प तब्बल ७० कोटी रुपयांवर गेला असूनही गेली सात वर्षे हा पूल रखडलेला आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढला आहे.
दिवा स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचे काम रखडले आहे. आधीच्या चुकांमधून काहीच न शिकता जबाबदार यंत्रणांनी परत निष्काळजीपणा केल्यामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. या गोंधळावर संतप्त झालेल्या प्रवासी संघटनांनी रेल्वे, एमआरव्हीसी, ठाणे महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. ‘विकासाच्या नावाखाली जमीन लुटायची आणि खर्च फुगवायचा हीच यंत्रणांची रणनीती आहे काय, असा सवाल करीत या संघटनांनी दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची आणि शासनाने जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे. २०१९मध्ये या दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला वर्क ऑर्डर मिळाली. त्या वेळी १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र जमीन संपादन, कायदेशीर अडथळे आणि स्थानिकांचा विरोध यांचा विचार न करता प्रकल्प रेटण्यात आला. यामुळे काम लांबणीवर पडले गेले. परिणामी महागाईमुळे खर्च दुपटीने वाढला. रेल्वे प्रशासनाचा निर्णय घेण्यातला ढिसाळपणा, समन्वयाचा अभाव आणि जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या एजन्सींमुळे सरकारी निधी वाया गेला. आज हा प्रकल्प विकासाचे नव्हे, तर अकार्यक्षमतेचे प्रतीक ठरत आहे.
लाखो प्रवाशांचे जीव धोक्यात
शंभर टक्के भूसंपादन न करता सुरू केलेले प्रकल्प हा शासकीय गोंधळात आहे. होम प्लॅटफॉर्मसाठी उभारलेला भाग वर्षभराहून अधिक काळ पडून आहे. काम रखडल्यामुळे ही संरचना धोकादायक बनत आहेत. दिवा स्थानकावर नित्याची गर्दी, त्यात अपूर्ण फलाटामुळे गाड्यांचे थांबे बाधित होत असून, परिणामी गोंधळ, अपघात आणि जीवितास धोका ही आता येथे नित्याची स्थिती झाली असल्याची माहिती प्रवासी संघटनांकडून देण्यात आली आहे.
१०० टक्के भूसंपादन न करता विकासकामे सुरू करणे ही प्रशासनाची बेफिकिरी आणि चुकीच्या नियोजनाची साक्ष आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
एका रेल्वे फाटकामुळे अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या सेवेला फटका बसत आहे. उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे शाळकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक होरपळत आहेत. सरकार ‘डबल इंजिन’ म्हणता, पण इथे ‘डबल विलंब’ अनुभवतोय. हा प्रश्न केवळ दिव्यापुरता नाही, तर लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून प्रकल्प तातडीने पूर्ण करावा. भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. उशिरा न्या मिळणे म्हणजे अन्यायच होय.
- वंदना सोनावणे, अध्यक्षा, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना
१०० टक्के भूमी अधिग्रहण न करता प्रकल्प सुरू करणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे गोंधळलेले आणि बेजबाबदार धोरण आहे. दिवा स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचे काम ठप्प आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने रेल्वे फाटक सतत बंद राहते. परिणामी गर्दी, गोंधळ, अपघात हे रोजचेच झाले आहे. सात वर्षांचा वेळ थोडा नसतो. सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा अन्यथा हा निष्काळजीपणा महागात पडेल.
- ॲड. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा प्रवासी संघटना
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.