६८ प्रवाशांवर गुन्हे दाखल
६८ प्रवाशांवर गुन्हे दाखल
पनवेल-डहाणू शटल रोखल्याप्रकरणी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : पनवेल-डहाणू मेमू शटल सेवा भिवंडी रोड रेल्वेस्थानकात अर्ध्या तासाहून अधिक काळ रोखून धरणाऱ्या ६८ प्रवाशांवर डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. १) रात्री घडली असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी विरोध करत रेल्वेसेवा रोखून धरल्याने या प्रवाशांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
दिवा-पनवेल मार्गावरील पनवेल-डहाणू ही मेमू शटल सेवा सोमवारी रात्रीच्या वेळी रोखण्यात आली. ही मेमू डहाणू, पालघर, बोईसर भागातील नोकरदारवर्गाला ठाणे, भिवंडी, पनवेल भागात नोकरीसाठी येण्यास सोयीचा पर्याय आहे. ही मेमू लोकल पनवेल येथून भिवंडी रोड रेल्वेस्थानकात ही गाडी ८ वाजून ५ मिनिटांनी येणे अपेक्षित होते, मात्र ही गाडी भिवंडी रेल्वेस्थानकात रात्री ९.०८ वाजता आली. या मेमूसाठी तब्बल एक तास प्रवासी ताटकाळत होते, ही मेमू उशिरा स्थानकात येताच प्रवाशांच्या संतापाच उद्रेक झाला. प्रवाशांनी पनवेल डहाणु मेमू शटलसमोर ठिय्या मांडला. या वेळी आंदोलक प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वे मार्गातून हटविण्याचा प्रयत्न केला. ते हटण्यास तयार नव्हते. यामध्ये ६० पुरूष ८ महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वे मार्गातून प्रवाशांना रात्री पावणेदहा वाजता बाजूला केले. त्यानंतर ही मेमू शटल डहाणूच्या दिशेने रवाना झाली. प्रवाशांनी अडथळा आणल्याने डहाणू शटल अर्धा तास भिवंडी रोड रेल्वेस्थानकात खोळंबली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी आंदोलनकर्त्या प्रवाशांविरुद्ध डोंबिवली रेल्वेस्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
..
सेवेला नेहमीच विलंब होत असल्याचा आरोप
‘पनवेल-डहाणू ही मेमू शटल सेवा नेहमी उशिरा येते. ही गाडी पनवेलहून सुटल्यावर या गाडीच्या आधी लांब पल्ल्याच्या गाड्या काढल्या जातात व ही गाडी बाजूला उभी केली जाते. त्यामुळे या गाडीला डहाणू येथे जाण्यास नेहमी विलंब होतो, ही गाडी उशिरा धावत असल्याने आम्हाला नेहमीच घरी जाण्यास उशीर होतो. आमची घरे रेल्वेस्थानकापासून खेडेगावात आहेत. त्यामुळे बस, खासगी वाहने निघून गेलेली असतात,’ अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.