तासिका शिक्षक पुन्हा अधांतरीच
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : महापालिका शाळांमध्ये तासिका तत्त्वावरील १३० शिक्षकांची केवळ चार महिन्यांकरिता पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली. त्यानुसार प्राथमिक विभागाकरिता ९० शिक्षक; तर माध्यमिक विभागाकरिता ४० शिक्षक कार्यरत असणार आहेत. हे शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात असल्याने यांना कायम सेवेत राहण्याचा दावा करता येणार नाही. त्यामुळे या शिक्षकांचे भवितव्य अधांतरीच असणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने शैक्षणिक सुविधांकरिता इमारती उभारल्या आहेत; मात्र एकीकडे या इमारती वाढत असताना शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गेल्या काही वर्षांपासून अपुरे पडत आहेत. यासाठी पालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांना वेळेत शिक्षक मिळावेत यासाठी मागील शैक्षणिक वर्षात महापालिकेने तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची भरती केली होती. या शिक्षकांनी सेवेत कायम करून घ्यावे, यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला होता. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष चालू होऊनही या शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात आले नव्हते. राज्य सरकारकडून कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध झाल्यास त्या दिवसापासून तासिका तत्त्वावरील शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे.
--------------------
केवळ १२५ रुपये मानधन
शाळा चालू होऊन १५ दिवस उलटले तरी शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अखेरीस या शैक्षणिक सत्रासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत या शिक्षकांना पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक विभागाकरिता प्रतितास १२५ रुपये, तसेच माध्यमिक विभागाकरिता प्रतितास १५० रुपयेप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.
-----------------
नोकरीच्या हक्काबाबत हमीपत्र
तासिका शिक्षकांना शालेय सुट्टी, रविवार, दिवाळी/उन्हाळी सुट्टीचे वेतन देण्यात येणार नाही. तसेच या शिक्षकांकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (नोटराईज्ड करुन) महापालिका सेवेत या पदावर कायम नोकरीबाबत भविष्यात कोणताही हक्क राहणार नाही, तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र घेण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.