पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर)ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भिवंडी पालिका आयुक्तांना अधिकाऱ्यांची बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असाव्यात, तसेच त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, यासाठी गणेशमूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सूचनांनुसार पर्यावरण व बांधकाम विभागाने गणेश घाटांजवळ कृत्रिम तलाव उभारून, त्या तलावांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनाची सोय करावी, असे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास प्रोत्साहित करावे, यासाठी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागात उभारायच्या कृत्रिम तलावांची संख्या व ठिकाणे निश्चित करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या. गणेश आगमन व विसर्जन रस्त्याची दुरुस्ती, त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पर्यावरण विभागामार्फत निर्माल्य एकत्रित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबाबत निर्देश दिले. तसेच नागरिकांनी उच्च न्यायालय व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त अनमोल सागर यांनी केले.
------------------------------
वऱ्हाळ तलावात विसर्जनाला बंदी
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत असलेल्या तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई केली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करून कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. भिवंडी शहरातील सर्वाधिक मूर्तींचे विसर्जन वऱ्हाळ तलावात होते, पण यंदा पालिका प्रशासनाकडून कृत्रिम तलावांबाबतची जनजागृती केली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जाणार असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.