भूकरमापकांचा कळणार ‘ठावठिकाणा’

भूकरमापकांचा कळणार ‘ठावठिकाणा’

Published on

भूकरमापकांचा कळणार ‘ठावठिकाणा’
भ्रमणध्वनीवर माहितीचा अभिनव उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः जमीन मोजणी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या वेळी अनेकवेळा भूकरमापक अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. मोजणी अर्जदार व पंचांची हे ताटकळणे टाळण्यासाठी भूकरमापन अधिकाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून टाकण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला. त्यामुळे अर्जदार, कार्यालय प्रमुखांना भूकरमापकांचा ठावठिकाणा कळणे शक्य होणार आहे. जमिनीची खरेदी-विक्री असो वा अन्य कोणताही व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी आणि कामे जलद व्हावी यासाठी अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. अर्ज भरल्यानंतर नागरिकांना मोजणी कार्यालयातून आगाऊ सूचना दिली. मात्र, अनेकवेळा दिवस आणि वेळ देऊनही भूकरमापक वेळेवर पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. म्हणूनच अर्जदार आणि भूकरमापक यांच्यामध्ये समन्वय राहावा तसेच भूकरमापक हे निश्चित कुठे आहेत, याबाबत स्पष्टता यावी याकरिता लाईव्ह लोकेशनचा वापर करण्याचे ठरविले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. यामध्ये त्यांनी प्रशासकीय सुधारणांवर भर दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून मोजणी प्रक्रियेमध्ये
व्हॉट्सॲप लाईव्ह लोकेशनचा वापर करून अर्जदारांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील, या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भूकरमापकांनी त्यांच्या मोजणी दौऱ्याप्रमाणे मोजणीस जाण्यापूर्वी त्यांचे लाईव्ह लोकेशन संबधित अर्जदार, लगतधारक तसेच कार्यालयप्रमुख यांच्या भ्रमणध्वनीवर व कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या उपक्रमाचे फायदे
अर्जदार, लगतधारक यांना भूकरमापक हे मोजणी स्थानापासून किती अंतरावर आहेत व मोजणी स्थळी पोहोचण्यास किती कालावधी लागेल याबाबत ठोस माहिती तात्काळ उपलब्ध होईल. तसेच, मोजणीचे थेट स्थान (लाईव्ह लोकेशन) दिल्याने
कार्यालयप्रमुखांदेखील आपले कर्मचारी मोजणी स्थानी पोहोचले आहेत किंवा नाही ही माहिती मिळते व कार्यालयप्रमुखांना अर्जदार, लगतधारक यांच्याकडून विचारणा झाल्यास त्याप्रमाणे त्यांना माहिती देण्यास सोयीचे होते.

लाभ घेण्याचे आव्हान
भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन ई-मोजणी, इप्सित पोर्टलवर ऑनलाईन फेरफार अर्ज सुविधा आणि प्रत्यय या प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज नागरिक अथवा विधीज्ञ यांना दाखल करता येतील. या आणि अशा सुविधा शासनाच्या ‘महाभूमी’
या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या असून नागरिकांनी सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com