कामगारांअभावी यंत्रमाग कारखाने बंद
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. ३ : भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कमी पगारात जास्त काम, सुविधांचा अभाव, वेळेची अनियमितता आदी कारणांनी या क्षेत्रातील कुशल कामगारांमध्ये निराशा पसरली आहे. आता त्यांची पावले पर्यायी रोजगाराकडे वळू लागली आहेत. त्यामुळे ७० वर्षांपासून पारंपरिक सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यांना उतरती कळा लागली आहे. तर स्वयंचलित यंत्रमाग कारखान्यात कामगारांना यथायोग्य सुविधा मिळत असल्याने हे कारखानदार कापड उत्पादनांत आपले पाय रोवून आहेत.
भिवंडी महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने पारंपरिक यंत्रमाग आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापड व्यवसाय स्पर्धेत येथील व्यापारी आणि कामगारांचा रोजगार टिकला पाहिजे, या हेतूने केंद्र व राज्य सरकारने २० वर्षांपासून विविध योजना जाहीर केल्या आहेत. परंतु, स्थानिक यंत्रमाग कारखाना मालक आणि व्यापाऱ्यांनी पारंपरिक यंत्रमागात अपेक्षित बदल न केल्याने या क्षेत्रातील कुशल कामगार कमी झाले. त्यातच देशाच्या विविध भागांतून रोजगारानिमित्ताने भिवंडीत आलेल्या कामगारांचा अशा पारंपरिक कारखान्यात रोजगारासाठी भ्रमनिरास झाला. पूर्वी चार यंत्रमाग चालवल्यानंतर मिळणाऱ्या वेतनात कामगार आपली उपजीविका करून गावी कुटुंबासाठी पैसे पाठवत होता. आता १२ यंत्रमाग चालवूनही ते वेतन मिळत नाही. गरजा वाढल्याने मिळणारे वेतनही अपुरे पडते. अशा स्थितीत अनेक समस्यांचा सामना करून अपेक्षित वेतन न मिळाल्याने कामगार इतर रोजगाराकडे वळला आहे. त्याचा परिणाम पारंपरिक यंत्रमागावर झाला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी कामगारांअभावी यंत्रमाग कारखाने बंद होत आहेत. या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.
३० टक्के कारखाने कायमचे बंद
भिवंडी हे आशियातील कापड उत्पादनातील सर्वांत मोठे यंत्रमागचे शहर आहे. या भागात सुमारे सात लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग चालू होते, जे संपूर्ण देशाच्या तुलनेत ३३ टक्के होते. येथील कापड उद्योगाची वार्षिक उलाढाल १० हजार कोटी रुपयांच्या आसपास होती. हा उद्योग भिवंडीमध्ये ७०० चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. या उद्योगातून मोठ्या संख्येने कामगारांना रोजगार मिळतो. येथे काम करणारे बहुतेक कामगार इतर राज्यांमधून येतात आणि १२ तासांच्या दोन शिफ्टमध्ये कठोर परिश्रम करतात. भिवंडीमध्ये दररोज ४२० लाख मीटर राखाडी कापडाचे उत्पादन होते. जे रंगविण्यासाठी आणि छपाईसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवले जाते. तसेच, येथे तयार केलेले कापड देशभरात विकले जाते. परंतु, कामगारांच्या कमतरतेमुळे आता या उद्योगावर वाईट परिणाम होऊ लागला आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे सुमारे ३० टक्के कारखाने कायमचे बंद पडले आहेत. त्यामुळे आता येथे फक्त पाच लाख पॉवरलूम चालू आहेत, अशी माहिती यंत्रमाग मालक देतात.
ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यात अकार्यक्षम
पूर्वी एक कामगार सहा यंत्रमाग चालवत असे; पण आता एक कामगार १२ यंत्रमाग चालवतो. असे असूनही, कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी कामगार उपलब्ध नाहीत. कामगारांच्या कमतरतेमुळे यंत्रमाग कारखाने मालक ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे मालकांना स्वयंचलित यंत्रमाग बसवणे किंवा व्यवसाय बदलणे याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे आर. के. टेक्सटाईलचे मालक राकेश केसरवानी म्हणाले.
सुविधांपासून वंचित
लूम कारखान्यांमध्ये कामगारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. पंखे आणि पाण्याची व्यवस्था नाही. एवढेच नाही तर कामगारांना मालकांकडून कारखाना कायद्याच्या कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. पीएफ, ईएसआयसीचा लाभ मिळत नाही. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसारखे वागवले जाते. अशा कारणांमुळे कोणीही यंत्रमाग कारखान्यात काम करण्यास कचरतात, अशी खंत लूम कारखान्यातील कामगार संदीप यांनी व्यक्त केली.
कामगारांचा गोदामाकडे कल
भिवंडीच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गोदाम वाढत आहेत. त्यामध्ये कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध असतात. सध्या गोदामात पुरुषांसोबत महिलांनाही रोजगार मिळत असल्याने यंत्रमाग कारखान्यातील कामगार गोदामाकडे वळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.