थोडक्यात बातम्या रायगड
रोटरी क्लब ऑफ रोहाकडून डॉक्टरांचा सत्कार
रोहा (बातमीदार) : डॉक्टर डेनिमित्त रोटरी क्लब ऑफ रोहाच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेचे नवीन वर्ष १ जुलै रोजी सुरू झाले आहे. या दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ रोहातर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या निवासस्थानी डॉक्टर डे साजरा करण्यात आला. या वेळी रोह्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अशोक जाधव यांच्यासह अन्य डॉक्टर मंडळींचा विशेष सत्कार करण्यात आला. देशातील सर्व डॉक्टरबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत प्रातिनिधिक स्वरूपात रोटरी परिवारातील रोह्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर मनीष वैरागी, डॉ. वीरेंद्र, डॉ. अनिल यादव, डॉ. प्रियांका धनावडे, डॉ. सुभाष म्हस्के, डॉ. श्रावणी एन., डॉ. साक्षी महाडिक, डॉ. अवनी डोईफोडे, डॉ. अमृता म्हस्के, डॉ. ऋतुजा पार्टे आदींचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे, सचिव जयदेव पवार, खजिनदार भूषण लुमण यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य सहपरिवार उपस्थित होते. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण तंदुरुस्त आहोत की नाही याचे आत्मपरीक्षण करून निरोगी, दीर्घायुष्य जगण्यासाठी स्वतःच स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे, याबाबत अतिशय उपयुक्त मार्गदर्शन डॉ. अशोक जाधव यांनी सर्व उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील धनावडे यांनी केले व सचिव जयदेव पवार यांनी आभार मानले.
.............
मुंबई-गोवा महामार्गाचा शिवसेना ठाकरे गटाकडून ९ जुलै रोजी पाहणी दौरा
पेण (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाकडून ९ जुलै रोजी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. कोकणातील एकमेव असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गेली १६ ते १७ वर्षे झाली, मात्र अद्याप हे काम पूर्णत्वास न गेल्याने अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिवाय ठेकेदाराकडून कामाची गुणवत्ता आणि वेगामध्ये सुधारणा न झाल्याने येत्या ९ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून महामार्गाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे सुरू असणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे तसेच तडे गेले आहेत, तर पुलाच्या संरक्षक भिंतीची उंची नियमाप्रमाणे नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय नवीन दिवे बंद पडले असून, सर्व्हिस रोड अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा अनेक तक्रारी वाहनचालकांकडून वारंवार होत असताना, याची कोणीही दखल घेत नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा समितीच्या वतीने या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. ९ जुलै रोजी खारपाडा पोलिस चौकी ते आमटेम या भागापर्यंत प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी दिली.
...............
पोयनाड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन
पोयनाड (बातमीदार) : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने पोयनाड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोयनाड-पांडवादेवी रस्त्यावरील जय मंगल कार्यालय येथे शनिवार १९ व रविवार २० जुलै रोजी या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा पुरुष एकेरी खुल्या गटामध्ये खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ज्या स्पर्धकांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी दीपक साळवी (७०२०६०२३३५), सचिन नाईक (८८५०४६२४११), पांडुरंग पाटील (७२७६३४७०१३), प्रदीप वाइंगडे (९७७३१८३०३०), अमित यादव (९९६९६०८२८०) या प्रतिनिधींकडे ११ जुलै संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शुल्कासह नावे नोंदवायची आहेत. या स्पर्धेकरिता ‘सुरको किंग’ कंपनीचे कॅरम बोर्ड वापरण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर हे कॅरम बोर्ड विक्रीसाठी उपलब्ध असतील. या कॅरम स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दीपक साळवी यांनी केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे व चषक दिले जाणार असून, सर्व खेळाडूंच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात येणार आहे.
..............
वीजतंत्री कर्मचारी रवींद्र आयनोडकर सेवानिवृत्त
रोहा (बातमीदार) : रोहा नगरपालिकेचे वीजतंत्री कर्मचारी रवींद्र कृष्णा आयनोडकर हे ३० वर्षे ६ महिने अशा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. रोहा नगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात बुधवारी (ता. २) रवींद्र आयनोडकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन रवींद्र आयनोडकर आणि त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना माहिती दिली. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, म्युन्सिनिपल एप्लोइज युनियन प्रदेश सरचिटणीस अनिल जाधव, म्युनिसिपल एप्लोइज युनियन प्रदेश कार्याध्यक्ष संतोष पवार, कार्यालयीन अधीक्षक विशाल काळे, अधिकारी उदयनाथ ठाकरे, सेवानिवृत्त कर्मचारी, शेळके, सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.