परिवहन सेवेचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचारी मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वारंवार विनंती करूनही मागण्या मान्य केल्या जात नसल्याने कर्माचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ४) संप पुकारण्याचे जाहीर केले होते, मात्र एक महिन्याच्या आत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने तूर्तास संप मागे घेण्यात आला आहे.
महापालिकेची परिवहन सेवा तीन कंत्राटदारांकडून चालविली जाते. या सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस दिला जातो, परंतु कंत्राटदाराने गेल्या वर्षी बोनस दिलेला नाही. याआधी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत मेमध्ये बोनस देण्याचे कंत्राटदाराने कबूल केले होते, मात्र त्यानंतरही बोनस देण्यात आला नाही. कर्मचाऱ्यांचा कॅशलेस आरोग्य विम्याची मुदत मार्चमध्ये संपली आहे व त्याचे नूतनीकरण झालेले नाही. दुसऱ्या कंत्राटदाराने जो विमा काढलेला आहे, त्याचा कर्मचाऱ्यांना कोणताही फायदा होत नाही.
परिवहन सेवेतील बस वारंवार नादुरुस्त होत असल्याने कामावर येऊनही कर्मचाऱ्यांना काम दिले जात नाही व त्याचा मोबदलाही दिला जात नाही. शिवाय जानेवारीपासून वाढीव महागाई भत्ताही देण्यात आलेला नाही. त्याची फरकाची रक्कम मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या श्रमिक जनरल कामगार संघटनेकडून वारंवार विनंती केल्यानंतरही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा करून शुक्रवारपासून संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. या संपाने सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होणार होते. त्यामुळे प्रशासनाकडून मध्यस्थी करून आगामी एक महिन्यात मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
अतिरिक्त मोबदल्यापासून वंचित
नियमानुसार चालकाची सेवा सहा तासांची असते. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त तासासाठी जादा मोबदला देणे आवश्यक आहे, मात्र कर्मचाऱ्यांची आठ तास सेवा होऊनही कंत्राटदारकडून अतिरिक्त मोबदला दिला जात नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.