बांधकामापेक्षा तोडकाम महाग

बांधकामापेक्षा तोडकाम महाग

Published on

बांधकामापेक्षा तोडकाम महाग
‘त्या’ इमारती पाडण्यासाठी चार कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : नाकापेक्षा मोती जड या म्हणीची प्रचिती सध्या ठाणे पालिकेच्या अतिक्रण निष्कासनाच्या कारवाईत येत आहे. शीळमधील खान कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने केलेल्या १८ इमारतींच्या कारवाईत आतापर्यंत तब्बल चार कोटी इतका खर्च आला आहे. म्हणजे अनधिकृत इमले रचताना जितका खर्च आला त्यापेक्षाही तोडकाम महाग पडत आहे. दरम्यान, या खर्चाचा बोजा सध्या महापालिकेच्या डोक्यावर असला तरी तो जमिन मालक, विकासकांकडून वसूल करण्यात येणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील शीळ भागातील खान कंपाउंड येथे उभारलेल्या साडेपाच एकर जमिनीवरील १७ इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार १९ जूनपासून अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई सुरु झाली आहे. ही कारवाई करीत असतांना याठिकाणी आणखी चार अधिकच्या इमारती आढळल्या आहेत. त्या इमारतींवर देखील कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहे. परंतु या इमारतींच्या पाडकामांसाठी महापालिकेचे मनुष्यबळ, साहित्य, यंत्रणा आदींसह वेळही वाया गेला असल्याने आता याचा खर्च महापालिका वसूल करणार आहे. त्यानुसार झालेल्या खर्चाचा अंदाज बांधला जात असून आतापर्यंत साडेचार कोटींच्या आसपास खर्च झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन कारवाई
महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, बैठी बांधकामे, वाढीव शेड, बांधकाम, आरसीसी इमारतीचे बांधकाम, बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडाउनचे बांधकाम, टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे. तसेच, खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com