ठाणे, मुंबईभोवती गॅसवाहिन्यांचे वर्तुळ
ठाणे, मुंबईभोवती गॅसवाहिन्यांचे वर्तुळ
काम अंतिम टप्प्यात
ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : मुंबई आणि ठाण्यात सुरू असलेल्या विविध कामांमुळे जमिनीखालून टाकण्यात आलेली गॅसवाहिनी अनेकदा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु महानगर गॅसकडून आता ही समस्या दूर होणार आहे. ठाणे आणि मुंबईला एकाच वाहिनीमधून गॅसचा पुरवठा व्हावा, यासाठी कंपनीने ठाणे आणि मुंबईभोवती गॅसवाहिनीचे वर्तुळ पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. ठाणेमार्गे गायमुख घाटापर्यंत आणून ठेवलेली वाहिनी आणि दहिसरकडून फाउंटन हॉटेलजवळ आणलेली वाहिनी एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच दोन्ही वाहिन्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत.
ठाणे आणि मुंबईमधील रस्त्यांवर मेट्रो, रुंदीकरण, उड्डाणपूल, मोठे नाले, युटिलिटी डक अशी विविध प्रकारची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना अनेकदा रस्त्याच्या खालून गेलेली गॅसवाहिनी बाधित होते. बाधित झालेली वाहिनी दुरुस्त करून गॅसपुरवठा पूर्ववत करण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. अशावेळी परिसरातील नागरिकांना गॅसचा मिळत नाही. परंतु भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी सुमारे तीन वर्षांपासून महानगर गॅस कंपनीने ठाणे आणि मुंबईच्या भोवती १२ इंच वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन-तीन महिन्यांत ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
कंपनीने ठाण्याहून घोडबंदरमार्गे रस्त्याखालून गायमुख घाटाच्या चढणीपर्यंत गॅसवाहिनी टाकली आहे. ती वाहिनी आता फाउंटन हॉटेलच्या दिशेने नेण्याचे काम सुरू केले आहे. कंपनीने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ न देता गायमुख घाटाजवळ आलेली वाहिनी पुढे नेण्याचे काम सुरू केले आहे. ही वाहिनी पुढे नेऊन ती दहिसरहून फाउंटन हॉटेलजवळ आणलेल्या मुंबईच्या वाहिननीला जोडली जाणार आहे. सुमारे चार किलोमीटरचे काम सप्टेंबरपर्यंत ठाणे, मुंबईच्या वाहिनीचे वर्तुळ पूर्ण होईल, असे कंपनीचे अधिकारी सतीश जाधव यांनी सांगितले.
सीएनजी पंपाचा मार्ग मोकळा :
दहिसर ते कासारवडवली या सुमारे सात-आठ किलो मीटरच्या अंतरावर सीएनजी गॅसचे पंप नसल्याने या वाहिनीमुळे या मार्गावर दोन्ही बाजूने गॅस पंप उभे राहू शकतात. त्यामुळे गुजरात, मुंबई आणि ठाण्याला जाणाऱ्या वाहनांना गॅस उपलब्ध होऊ शकेल. त्यासोबतच भविष्यात घोडबंदर ते काशिमीरापर्यंत होणाऱ्या इमारतींनादेखील गॅस मिळू शकणार आहे.
१२ इंच व्यासाची स्टीलची वाहिनी :
ठाणे आणि मुंबईभोवती रस्त्याच्या बाजूने सुमारे पाच फूट जमिनीखाली टाकण्यात आलेली वाहिनी पूर्णतः स्टीलची आहे. तिचा व्यास १२ इंच आहे. त्यामुळे वाहिनी मातीने गंजण्याचा प्रकार घडणार नाही. ठाणे किंवा मुंबईदरम्यान एखाद्या ठिकाणी वाहिनी बाधित झाली तरी त्या ठिकाणापर्यंतचा गॅस पुरवठा बंद होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या गॅसपुरवठ्यावरही परिणाम होणार नाही. बाधित ठिकाणचे काम पूर्ण होईपर्यंत ठाणे आणि मुंबई एकमेकांना गॅस पुरवत राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.