जिवंत नागाच्या पूजेविरोधात पर्यावरणवाद्यांमध्ये संताप
जिवंत नागाच्या पूजेमुळे पर्यावरणवाद्यांमध्ये संताप
उरण, ता. ३ (वार्ताहर) ः नागपंचमीच्या दिवशी राज्यात बंदी घातलेल्या जिवंत नागाची पूजा पुन्हा सुरू करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध पर्यावरणवादी संतप्त झाले आहेत.
शासनाच्या या निर्णयाला विरोध करताना प्रसिद्ध हर्पेटोलॉजिस्ट मृगांक प्रभू म्हणाले, की वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची - १ अंतर्गत संरक्षित प्रजाती असलेल्या नागाला हानी पोहोचवणारी ही प्रथा पुन्हा सुरू करण्याची गरज नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रथेविरुद्ध निकाल दिल्यानंतर आणि आदिवासी समुदायाला साप पकडण्यापासून रोखण्यासाठी तसेच त्यांच्या विधींचे पालन करण्याचे निरुपद्रवी मार्ग शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर ही प्रथा लोप पावत चालली आहे, असे प्रभू यांनी सांगितले. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले, की सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की, साप दूध पीत नाहीत. काही जणांकडून त्यांचे दात आणि विषग्रंथी काढून टाकण्यात येतात. तसेच नागांना काही दिवस उपाशी ठेवण्यात येते. त्यामुळे भक्तांनी अर्पण केलेले दूध चाटण्यास ते भाग पडतात. त्यामुळे ही एक अतिशय क्रूर प्रथा होती. यामुळे सापांना त्रास होत होता, असे कुमार यांनी निरीक्षण केले. ज्या सापांची ते इतक्या भक्तीने पूजा करतात त्यांच्याशी क्रूर वागू नये, यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात शिक्षित करण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव मित्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच जिवंत नागपूजा उत्सव पुन्हा सुरू करण्याच्या मागणीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी राज्य विधानसभेत आश्वासन दिले होते, की ते केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे जिवंत नागाची पूजा करण्याचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला अनेक पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.