राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे कार्यान्वित कार्यान्वित करणार
राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे कार्यान्वित करणार
सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ३ : राज्यातील बांधकाम पूर्ण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे कार्यान्वित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारकडे केली. त्या अनुषंगाने लवकरच सर्व आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लेखी स्वरूपात दिले.
राज्यात २०२१ ते २०२५ या कालावधीत ४१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, सद्यःस्थितीत त्यातील २१३ केंद्रे अद्याप सुरू झाली नसल्याचे मे २०२५मध्ये निदर्शनास आले आहे. या आरोग्य केंद्रांना आवश्यक असलेले फर्निचर, वीजजोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, काही ठिकाणी उद्घाटन कोण करणार, असे प्रश्न निर्माण होणे तसेच आरोग्य कर्मचारी नेमण्यासाठी निधी देण्यात येत नसणे इत्यादी कारणास्तव ही आरोग्य केंद्रे अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारने चौकशी करून त्याअनुषंगाने ही प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना मूलभूत सुविधांसाठी तत्काळ निधी वितरित करून विनावापर असलेली आरोग्य केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही केंद्रे तातडीने सुरू करून गावागावात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवावी, असेही आमदार ठाकूर यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून नमूद केले.
या प्रश्नावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले, की २०२१ ते २०२५ या कालावधीत ४१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, सद्यःस्थितीत काही केंद्रे अद्याप सुरू झाली नसल्याची बाब अंशतः खरी आहे. सद्यःस्थितीत बांधकाम पूर्ण करण्यात आलेल्या २१३ उपकेंद्रांपैकी २०६ आरोग्य केंद्रे कार्यान्वित झालेली असून, उर्वरित आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे. २०६ आरोग्य उपकेंद्रांत आरोग्यसेवा सुरू करण्यात आली असून, उर्वरित सात आरोग्य उपकेंद्रांतील फर्निचर व वीजजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही आरोग्य उपकेंद्रे कार्यान्वित करण्यात येतील. तसेच आरोग्य उपकेंद्रांत आरोग्यविषयक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता पुरवणी मागणीचा प्रस्ताव विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.