कल्याण-शीळ मार्गावरील पलावा पुलाचे उद्घाटन; दोन तासांत पूल बंद
उद्घाटनानंतर पूल बंद
अपूर्णावस्थेतील पलावा पुलाचे घाईत लोकार्पण; सत्ताधाऱ्यांवर नागरिकांचा रोष
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण-शिळ रोडवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पलावा पूल शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला आणि बंददेखील झाला. कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी हा पूल घाईघाईने सुरू करीत विरोधकांवर टीका केली; मात्र पुलाचे काम शिल्लक असल्याने हा पूल पुन्हा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
शिवसेना शिंदे गटाने पुलाचे लोकार्पण करताच पुलावरून तुरळक प्रमाणात वाहतूक सुरूदेखील झाली. पण काही तासांतच ही वाहतूक बंद करण्यात आली. पुलाचे काम काही प्रमाणात शिल्लक असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासकीय यंत्रणेकडून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे सत्ताधाऱ्यांवर सर्वच स्तरांतून टीका करण्यात येत आहे. पुलाचे काम पूर्ण झालेले नाही, प्रशासनाचे कोणी अधिकारी उपस्थित नाहीत. अशातच पूल सुरू करून अवघ्या दोन तासांत बंद करावा लागला. मग पुलाच्या उद्घाटनाची घाई नेमकी कशासाठी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कल्याण-शिळ रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावर वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडी ते काटई चौक अशा दोन पुलांची उभारणी करण्यात येत आहे. यातील एका पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आमदार राजेश मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मेअखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगितले होते. त्या वेळी खूप काम शिल्लक असल्याने आणि अवकाळी पावसामुळे कामास विलंब झाल्याचे सांगत जूनअखेरीस हा पूल खुला केला जाईल, असे त्यांनी सांगितले. परंतु जुलै महिना उजाडला तरी पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही तसेच कामदेखील पूर्ण न झाल्याने सत्ताधारी, प्रशासनावर टीका होत होती.
पुलाच्या उद्घाटनाची तारीख पे तारीख दिली जात होती. याविषयी ‘सकाळ’ने २ जुलैला ‘पलावा पुलांची रखडपट्टी’ या मथळ्याखाली वृत्तदेखील प्रसारित केले होते. यानंतर दोनच दिवसांत शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी कार्यकर्त्यांसह शुक्रवारी सकाळी पलावा पुलाचे उद्घाटन केले.
विरोधकांना टोला
आमदार राजेश मोरे म्हणाले, ‘‘कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून पलावा पुलाची उभारणी करण्यात आली. हा पूल आजपासून वाहनांसाठी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे लोक खूश होतील, अशी आम्हाला आशा आहे. विरोधकांना आम्ही हेच सांगू इच्छितो, की आम्ही ट्विटरद्वारे केवळ टीका करीत नाही. ग्राउंड लेव्हलला उतरून काम कसे चालले आहे, याची पाहणी करतो आणि तसेच आम्ही काम करून दाखवतो. विरोधकांनादेखील सांगतो, की पूल सुरू झालेला आहे.’’
मतांसाठी राजकारण : मनसे
मनसे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करीत ‘पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही,’ असे ट्विट केले आहे. आज स्वतःला ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ म्हणवणारे कोणताही गाजावाजा न करता आपल्या समर्थकांकडून पूल सुरू करून मोकळे झाले खरे, पण काही वेळातच हा पूल बंद करण्यात आला आहे. नक्की काय गोंधळ आहे, असा सवाल करीत पाटील यांनी भय्याजी हमार पुल ठिक हैं ना बा? ये छू छे गांडाभाई? असे म्हणत मतांसाठी सुरू असलेले हे राजकारण असल्याची टीका केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.