न्यायवृदांच्या पद्धतीत पारदर्शकता'' आणणार - सरन्यायाधीश गवई

न्यायवृदांच्या पद्धतीत पारदर्शकता'' आणणार - सरन्यायाधीश गवई

Published on

न्यायवृंदाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणणार!
सरन्यायाधीश गवई यांचा बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : न्यायमूर्तींच्या नियुक्तीसंदर्भात न्यायवृंदाच्या (कॉलेजियम) कार्यपद्धतीत पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
न्याय देणे आणि घटनेचे पालन करणे हे न्यायमूर्तींचे प्रमुख कर्तव्य आहे. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायवृंदामध्ये नियुक्त्यांबाबत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथील कार्यक्रमात न्या. दीपांकर दत्ता यांनी न्यायवृंदाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याबाबत भाष्य केले होते. न्यायमूर्तींच्या नियुक्तीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही तसेच न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी आलेल्या नावांमध्ये सर्व घटकांतील प्रतिनिधींचा समावेश असेल. न्यायव्यवस्थेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्न वराळे, न्या. अनिल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे यांच्यासह अन्य न्यायमूर्ती, महाधिवक्ता, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आणि ज्येष्ठ वकीलही उपस्थित होते.
---
वकिलांच्या प्रयत्नांमुळे बढती!
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून २०१९मध्ये आपल्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्या वेळी तत्कालीन न्यायवृंदातील एक न्यायमूर्ती आपल्या बाजूने नव्हते. गेल्या सहा वर्षांपासून आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहोत. तथापि आतापर्यंत हे गुपित आपण कधीही उघड केले नाही. त्या न्यायमूर्तींना आपल्या नावाबाबत काही शंका होती. आपल्याला सर्वोच्च न्यायालयात बढती मिळल्यास मुंबईतील काही वरिष्ठ वकिलांमध्ये अशांतता निर्माण होईल, असे त्या न्यायमूर्तींना वाटत होते. त्या वेळी बॉम्बे बार असोसिएशनच्या अनेक वरिष्ठ वकिलांनी दिल्लीत या न्यायमूर्तींची भेट घेऊन आपल्याबाबत चुकीच्या धारणा असल्याचे त्यांना पटवून दिले. बॉम्बे बार असोसिशनच्या प्रयत्नांमुळे आपली सर्वोच्च न्यायालयात बढती झाली. आपण त्यासाठी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू, असे न्या. गवई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com