औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिनीला गळती

औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिनीला गळती

Published on

रोहा, ता. ५ (बातमीदार) ः धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर वाहिनीद्वारे दूषित सांडपाणी गोफण गावातील खाडीत सोडले जाते; मात्र ही वाहिनी खारगाव येथे फुटल्याने दूषित सांडपाणी भारती भालचंद्र मळेकर यांच्या शेतात शिरल्‍याने भातलावणीपूर्वीच शेती उद्‌ध्वस्‍त झाली. या प्रकारामुळे मळेकर कुटुंब हवालदिल झाले असून एमआयडीसी प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्‍यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही जलवाहिनी फुटण्याची घटना घडली होती. या वेळी नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांना एमआयडीसी प्रशासनाकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. नुकसानग्रस्त शेतकरी महिलेला व तिच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी खारगाव ग्रामस्थांकडून होत आहे.
धाटाव एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यातील दूषित पाणी सीईटीपी केंद्रात शुद्धीकरण करून ११ किलोमीटर लांब असलेल्या चणेरा मार्गावरील गोफण खाडीत सोडले जाते. शुक्रवारी (ता. ४) सांडपाणी वाहून नेणारी सांडपाणी वाहिनी खारगावातील भारती भालचंद्र मळेकर या महिलेच्या शेताच्या बांधाजवळ फुटली. सांडपाणी शिरल्‍याने मळेकर यांची शेती नापीक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्‍थांनी घटनास्‍थळी धाव घेतली.
एमआयडीसी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दूषित पाणी शिरल्‍याने मळेकर यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली शेती नापीक झाली आहे. पावसाळी शेती आणि दोन म्हशी या माध्यमांतून गुजराण करणाऱ्या मळेकर कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्‍याची माहिती मिळताच, एमआयडीसीचे अधिकारी विनीत कोळगावकर व उपअभियंता शशिकांत गीते यांना घटनास्थळी भेट दिली. या वेळी पंकज मळेकर यांच्यासह अन्य ग्रामस्‍थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्‍त केला, तसेच नुकसानभरपाईची मागणी केली.
२०२२ मध्येही खारगाव येथे जलवाहिनी फुटल्याची अशीच घटना मळेकर यांच्या शेतात घडली होती. त्या वेळी नुकसानभरपाईसह पंकज मळेकर यांना एखाद्या कंपनीत रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र त्‍याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

नुकसानीचा प्रस्‍ताव मुख्यालयात पाठवणार
खारगाव येथे सांडपाणी वाहिनी फुटल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी केली आहे. तहसील कार्यालयामार्फत या घटनेचा पंचनामा केला जाईल. त्यानंतर नुकसानीचा प्रस्ताव मुंबईतील मुख्य कार्यालयात पाठविला जाईल. तसेच तीन वर्षांपूर्वी सांडपाणी वाहिनी फुटून झालेल्या नुकसानीचीदेखील भरपाई देण्याचा प्रयत्‍न करण्यात येईल, अशी माहिती धाटाव एमआयडीसीचे उपअभियंता शशिकांत गीते यांनी सांगितले.

रोहा ः एमआयडीसीमधील दूषित सांडपाणी वाहिनीला गळती लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com