अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त

अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त

Published on

तुर्भे, ता. ७ (बातमीदार ) : नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या नियोजनाअभावी प्रवासी हैराण झाले आहेत. अपुऱ्या बससेवमुळे ताटकळत उभे राहावे लागत असल्‍याने प्रवाशांमधून संताप व्यक्‍त होत आहे. काही प्रवासी बसचालकांशी हुज्‍जत घालत असल्‍याने वादविवादाच्या घटना वाढल्या आहेत.
एनएमएमटीच्या माध्यमातून शहरात बससेवा पुरवली जाते, मात्र उपक्रमामध्ये जेव्हापासून इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत, तेव्हापासून वेळापत्रक कोलमडले आहे. इलेक्ट्रिक बस खासगी कंपन्यांमार्फत पुरवल्‍या जात आहेत. यासाठी सरकारकडून अनुदानही मिळते. हे अनुदान लाटण्यासाठी अनेक खासगी कंपन्या बसपुरवठा करण्यामध्ये उतरल्या आहेत. पाच वर्षांत विविध कंपन्यांनी एनएमएमटी प्रशासनाला बस पुरवल्‍या आहेत. या बस रस्त्यावर धावून काही महिने होत नाही तोच तक्रारी वाढू लागल्या होत्या. गळक्‍या बस, बॅटरी चार्जिंगमधील त्रुटींमुळे दररोज अनेक बस फेऱ्या रद्द होत आहेत. मुंबईत काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने थेट बसवाहकाला मारहाण केल्याची घटना घडली. याशिवाय रस्‍त्‍यात बस बंद पडण्याचे प्रकारही वाढले आहेत.
नवी मुंबई शहराची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक असून, एनएमएमटीच्या ताफ्यात सुमारे ६०० ते ७० बसची आवश्यकता आहे. तूर्तास केवळ ३५० ते ३७० बस प्रवाशांच्या सेवेत असून, प्रतिदिन २६ ते २८ लाखांचे उत्‍पन्न मिळते. गतवर्षी सुमारे ४०० ते ४५० बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत्‍या आणि प्रतिदिन सुमारे ३८ ते ४० लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते.

प्रवाशांच्या तुलनेत फेऱ्या अपुऱ्या
घणसोली आगारातून दररोज १६५ बस मार्गस्‍थ होणे अपेक्षित आहे, मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही दिवसांपासून केवळ ४५ ते ५० बस उपलब्ध होत आहेत. या आगारातील बसअभावी १३० फेऱ्या रद्द होत आहेत. घणसोली बस आगारात महालक्ष्मी एजन्सीच्या ११४ बस पडून आहेत. तसेच उपक्रमाच्या ३० इलेक्ट्रिक बस तांत्रिक कारणामुळे बंद ठेवल्‍या आहेत. आसूडगाव आगरातून ९३ बस मार्गावर देण्याचे नियोजन आहे. तुर्भे आगारातून १६५ बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, परंतु प्रत्यक्षात १३० ते १३६ बस मिळतात.

प्रवाशांच्या तुलनेत एनएमएमटीकडे बसची संख्या कमी आहे. फेऱ्या कमी झाल्‍याने बसचे वेळापत्रक कोलमडले असून, नवीन बस आल्या की फेऱ्या वाढविण्यात येतील.
- योगेश कडूसकर, परिवहन व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com