टिटवाळा येथील संत ज्ञानेश्वर शाळेची दुरवस्था
टिटवाळ्यातील संत ज्ञानेश्वर शाळेची दुरवस्था
टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शिक्षण व्यवस्थेत सुधारणेचे दावे केले जात आहेत; मात्र मांडा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर शाळेची अत्यंत दुरवस्था झाली आहे. एका बाजूला आयुक्त अभिनव गोयल यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सात शाळांमध्ये सेमी-इंग्रजी शिक्षण सुरू करण्याच्या आणि ‘निपुण भारत अभियान’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर शाळेसारख्या विद्यमान शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ही परिस्थिती महापालिकेच्या शिक्षण क्षेत्रातील दाव्यांमधील विरोधाभास स्पष्टपणे दर्शवते.
मांडा-टिटवाळा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर शाळेची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. शाळेच्या अनेक वर्गखोल्यांचे पत्रे तुटलेले आहेत. ज्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याहून गंभीर बाब म्हणजे, शाळेच्या इमारतीचे फाउंडेशन खालून पोखरलेले आहे. यामुळे उंदीर, साप आणि इतर प्राण्यांचा वावर वाढला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. शाळेत इन्व्हर्टरची सुविधा नसल्याने पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागते. शौचालयांमध्येही अंधार असल्याने तिथे अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या शाळेत साधारणतः २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महापालिकेच्या एकूण ५७ शाळांपैकी अ प्रभाग क्षेत्रात सात शाळा आहेत. ज्यांपैकी संत ज्ञानेश्वर शाळा ही एक आहे. या शाळेची दुरवस्था झाली असतानाच आयुक्तांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत नेतिवली, तिसगाव, पाथर्ली, उंबर्डे, बारावे, मांडा आणि मोठागाव येथील शाळांमध्ये सेमी-इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या शाळांमध्ये माध्यम मराठीच कायम ठेवून गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धात्मक शिक्षणासाठी बळ मिळेल, असे म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, मोजे, बूट या सर्व गोष्टी मोफत दिल्या जाणार आहेत. ‘विनोबा भावे ॲप’च्या माध्यमातून शाळेचे डिजिटल मॉनिटरिंग करण्यात येणार आहे.
एकीकडे महापालिका गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर शाळेसारख्या शाळांची पायाभूत सुविधांचीच वाताहत झाली आहे. माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी या शाळेला भेट देत तिची दुरवस्था समोर आणली आहे ते याबाबत आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात एक पत्र देणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
महापालिकेने शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी, संत ज्ञानेश्वर शाळेची सद्यःस्थिती हे दर्शवते की, केवळ नव्या योजना जाहीर करून उपयोग नाही, तर विद्यमान शाळांच्या मूलभूत सोयीसुविधांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन सेमी-इंग्रजी शाळा सुरू करण्याच्या उत्साहात, जुन्या शाळांच्या दुरुस्तीकडे आणि देखभालीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखे आहे. महापालिकेने या विरोधाभासावर गांभीर्याने विचार करून सर्व शाळांमध्ये समान आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.