फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचा पत्त्याचा डाव

फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचा पत्त्याचा डाव

Published on

प्रभाग कार्यालयातच रंगला पत्त्यांचा डाव
फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील आठ ते नऊ कर्मचारी बुधवारी (ता. २) दुपारी कार्यालयीन वेळेत पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पालिका प्रशासनाने याची दखल घेत सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी संबंधित पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. ठरावीक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून असून, त्यांचे प्रस्थ वाढले आहे. यामुळे हे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

कल्याण ग्रामीण भागातील रिजन्सी इस्टेट परिसरात केडीएमसीचे ई प्रभाग कार्यालय आहे. या प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील आठ ते नऊ कामगार दुपारच्या वेळेत पत्ते खेळत बसल्याचा व्हिडिओ बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज गिरी यांनी समाजमाध्यमात व्हायरल केला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ई प्रभागातून बदली होऊनदेखील ठाण मांडून बसलेले कर्मचारी हे पत्ते खेळत होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पालिका कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात होता. व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पत्ते खेळणाऱ्या पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन हजेरी लावून घरगुती कामे करणे, बाजारात फेरी मारून दुकानदार, फेरीवाल्यांच्या भेटीगाठी घेणे असे प्रकार करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

वर्षानुवर्षे एकाच प्रभागात
ई प्रभाग हद्दीतील डोंबिवली एमआयडीसी कावेरी चौक, पेंढरकर महाविद्यालय परिसरातील रस्ते, २७ गाव, सागाव, नांदिवली, देसलेपाडा, स्वामी समर्थ मठ परिसर, भोपर, शिळफाटा रस्त्यालगत फेरीवाले, भेळपुरी विक्रेते रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर हे पथक कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आहेत. फेरीवाला हटाव पथकातील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; मात्र बदलीच्या ठिकाणी हे कर्मचारी जात नसून वर्षानुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com