खड्ड्यांविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या
खड्ड्यांविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या
रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची; रिक्षाचालकांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः डोंबिवली पश्चिमेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. रिक्षाचालक आणि नागरिकांसमोर दररोजचा प्रवास म्हणजे एक दिव्य ठरत आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नाही. वातानुकूलित कार्यालयात बसून लाखो रुपये पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यांची दुरुस्ती करण्याची तसदी घ्यावी वाटत नसल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता. ४) संतप्त रिक्षाचालकांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन केले.
डोंबिवली रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजा चव्हाण, सरचिटणीस भगवान मोरजकर, सचिव विजय गावकर यांच्यासह शेकडो रिक्षाचालकांनी भरपावसात महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. तसेच कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यामुळे उमेशनगर रस्त्यावर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिस प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर महापालिका अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. परिणामी, अनेकांना कंबरेच्या दुखण्याचा त्रासही जाणवतो आहे. विशेषतः गरिबाचा वाडा, महाराष्ट्रनगर, महात्मा फुले रोड, दोन पाण्याची टाकी, उमेशनगर, सुभाष रोड, कुंभारखान पाडा या परिसरांतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तेथील नागरिक आणि रिक्षाचालक रोजच्या प्रवासात त्रस्त झाले आहेत. प्रत्येक वर्षी महापालिकेकडून रस्त्यांचे केवळ मलमपट्टी स्वरूपाचे काम केले जाते. त्यामुळे काही महिन्यांतच खड्डे पुन्हा दिसू लागतात.
आंदोलनाचा इशारा
आता खड्डे न भरल्यास मोठ्या प्रमाणात ‘रिक्षा बंद’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरचिटणीस भगवान मोरजकर यांनी दिला. ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांना रिक्षाचालकांनी खड्ड्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवेदन सादर केले. यानंतर सावंत यांनी पुढील दोन दिवसांत डोंबिवली पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.