वैतरणा खाडीवरील पुलाची निविदा प्रक्रिया रखडली

वैतरणा खाडीवरील पुलाची निविदा प्रक्रिया रखडली

Published on

मनोर, ता. ७ (बातमीदार) : वैतरणा खाडीवरील बहाडोली-दहिसर गावादरम्यानच्या पुलाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान त्याची रुंदी वाढवण्याच्या मागणीनंतरच्या सुधारित अंदाजपत्रकाला एमएमआरडीएकडून मंजुरी मिळाली नसल्याने निविदा प्रक्रिया रखडली आहे. वैतरणा खाडीवरील पूल पालघर तालुक्यातील पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नुकत्याच महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या कार, तसेच हलक्या वाहनांना बहाडोली-दहिसरदरम्यान वसई-विरार महापालिकेने उभारलेल्या पुलाचा मोठा आधार मिळाला होता. पुलाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी, तसेच निविदा प्रक्रिया राबवून पुलाचे काम सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

एमएमआरडीएकडून पालघर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी १,७०० कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. यात १२८ कोटींची अंदाजपत्रकीय रक्कम असलेल्या दहिसर-बहाडोली गावादरम्यान वैतरणा खाडीवरील पुलाचा समावेश होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुलाची निविदा राबवण्यात आली होती. तसेच माती परीक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले होते.

दरम्यान, निधीअभावी एमएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सतराशे कोटींच्या कामांमध्ये दहिसर-बहाडोली पुलाच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागली होती.

१२८ कोटींचा खर्च अपेक्षित
पालघर मुख्यालयावरून मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या धुकटन- बहाडोली- दहिसर रस्त्यावर दहिसर आणि बहाडोलीदरम्यान वैतरणा खाडीवर वसई-विरार महापालिकेच्या अरुंद पुलालगत एमएमआरडीएमार्फत १२८ कोटी रुपये खर्चून पूल उभारला जाणार होता.

लोकप्रतिनिधींकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न
तत्कालीन खासदार राजेंद्र गावित यांनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएला पत्रव्यवहार, तसेच पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएने निधी मंजूर केल्याचे सांगत कामाचे श्रेय घेतले होते. माजी आमदार राजेश पाटील यांनी दहिसर- बहाडोली पुलाच्या कामासाठी निधी मंजूर केल्याचे बॅनर लावले होते. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत एमएमआरडीएमार्फत विकासकामे मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगत श्रेय घेतले होते. शिंदे गटाचे आदिवासी आघाडीचे नेते जगदीश धोडी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून पालघर जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबाबत शिंदे यांचे आभार मानले होते.

वैतरणा खाडीवरील बहाडोली- दहिसरदरम्यानच्या पुलाचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात आले आहे. मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल.
- सुरेंद्र शेवाळे, उपअभियंता, एमएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com