थोडक्यात बातम्या रायगड
माणगाव ग्रामीण पतसंस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा
माणगाव (बातमीदार) ः माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदविका, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संस्थेच्या सभासद पाल्यांचा (विद्यार्थ्यांचा) गुणगौरव सोहळा शनिवारी (ता. ५) संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स, निजामपूर रोड या ठिकाणी उत्साहात पार पडला. या वेळी संस्थेचे चेअरमन आनंद यादव, तसेच संचालक दिलीप जाधव, दिलीप अंबुर्ले, उदय म्हशीलकर, संदीप खरंगटे, सर्व कर्मचारी वृंद, पालकवर्ग, स्वल्पबचत प्रतिनिधी उपस्थित होते. गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन आनंद यादव यांनी आपल्या मनोगतात गुणगौरव सोहळ्यास उपस्थित असलेल्या विद्यार्थी व पालकवर्ग यांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उपस्थित सर्वांसमोर मांडला.
..............
ट्विंकल फ्रेंड्स ग्रुप अध्यक्षपदी संदीप जैन यांची निवड
रोहा (बातमीदार) ः गेली ४० वर्षे शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी रोहा बाजारपेठेतील ट्विंकल फ्रेंड्स ग्रुपच्या अध्यक्षपदी संदीप जैन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ट्विंकल फ्रेंड्स ग्रुपची सर्वसाधारण सभा भुवनेश्वर येथील लीलावती महाविद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात महावीर जैन यांच्या अध्यक्षपदाखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने ग्रुप अध्यक्षपदी संदीप जैन, उपाध्यक्ष सुरेंद्र जैन, खजिनदार विलास गुजर यांची निवड करण्यात आली. या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, राजू जैन, भरत जैन, विनोद जैन, कैलास जैन आदी जण उपस्थित होते. माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे यांनी नवीन कार्यकारी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
..........
ग्रामीण साहित्यिकांचे स्मरण व काव्य प्रकाशन सोहळा
खोपोली (बातमीदार) ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, खोपोली आणि खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामीण साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व र. वा. दिघे यांच्या ४५व्या पुण्यतिथीनिमित्त एक विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ४) र. वा. दिघे वाचनालय, पाटणकर चौक, खोपोली येथे पार पडला. या साहित्यिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते, सुप्रसिद्ध लेखक, गजलकार डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या ‘बाल्याच्या मनांमदी’ या विडंबन काव्यसंग्रहाचे प्रकाशन, विविध साहित्यप्रकारांवर समर्थपणे मुशाफिरी करणाऱ्या डॉ. कटकदौंड यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनाचे, समाजभानाचे आणि मानवी भावविश्वाचे संवेदनशील चित्रण या वेळी दिसून आले.
........
शहरी शेती ओळखवर्ग
अलिबाग (वार्ताहर) ः टेरेस, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्या परिसरात, किमान चार तास सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे-फुले लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’. रविवारी (ता. ६) सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजता होणाऱ्या शहरी शेती ओळखवर्गात मृणालिनी साठे आणि दिलीप हेर्लेकर मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीकरिता मराठी विज्ञान परिषद, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२, मोबा. ९९६९१००९६१ येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.