त्या शिवशाहीबाबत दोषींवर होणार कारवाई

त्या शिवशाहीबाबत दोषींवर होणार कारवाई

Published on

ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाच्या ठाणे-कोल्हापूर बसच्या दुरवस्थेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे विभागाने ही बस तत्काळ ठाण्याला परत बोलवून घेतली. तसेच, दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे विभाग वाहतूक नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले आहे. अत्यंत दयनीय अवस्थेत ही बस ठाणे आगार क्रमांक २ येथून सोडण्यात आली होती; मात्र एका महिला प्रवाशाने बसचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर ठाणे विभागातील अधिकाऱ्यांनी सावरासावरी करत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
ठाणे आगार क्रमांक २ (खोपट) येथून सकाळी ५.३०च्या सुमारास ठाणे-कोल्हापूर ही शिवशाही बस धोकादायक स्थितीत रस्त्यावर सोडण्यात आली. बसची कोणतीही तपासणी आणि स्वच्छता न करता त्यात प्रवासी बसवण्यात आले. कोल्हापूरला जाण्यासाठी या वातानुकूलित बसचे भाडे ९००च्या आसपास आहे. एका महिला प्रवाशाने शुक्रवारी (ता. ४) बसच्या वाईट अवस्थेतचा व्हिडीओ ठाण्यातील पत्रकाराला पाठविल्यानंतर तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर ठाणे विभागातील अधिकाऱ्यांची सावरासावर सुरू झाली. कळवा कार्यशाळेचे प्रमुख विवेक लोंढे यांना याबाबत विचारले असता बसची तपासणी न करता ती पाठवली असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. ठाणे विभाग वाहतूक नियंत्रक सागर पळसुले यांना विचारले असता ही बस तत्काळ ठाणे आगारात बोलावून घेतली असून, तिची पाहणी आणि चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे म्हटले.

अनेक बसची दुरवस्था!
ठाणे विभागाकडे प्रवासी वाहतूकीसाठी महामंडळाच्या ५३७ बस आहेत. त्यामध्ये ५७ बस शिवशाहीच्या आहेत. या बसची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर सर्वांत जास्त बंद पडणाऱ्यांमध्ये त्यांचा सर्वांत मोठा वाटा आहे. बसमधील संगणक अनेकदा बंद असतात. प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असते. बसचे भाग खिळखिळे असल्याने मोठ्या प्रमाणात आवाज होतो. असे एका शिवशाही चालकाने सांगितले.

परिवहनमंत्र्यांनी एसटी प्रवास करावा!
परिवहनमंत्री ठाण्यात राहतात; मात्र त्यांच्या जिल्ह्यातील अशा धोकादायक बसमधून प्रवाशांना वाहतूक करावी लागते. बसची सत्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल, तर मंत्र्यांनी अशा बसमधून लांब पल्ल्याचा प्रवास करून दाखवावा, असे काँग्रेस पक्षाचे ठाणे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com