थोडक्‍यात नवी मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

Published on

कुकशेतमध्ये रंगणार आषाढी एकादशीचा सोहळा
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) ः आषाढी एकादशीनिमित्त कुकशेत गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये रविवारी, ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात रंगणार आहे. नवीन कुकशेत देवस्थान समिती व कुकशेत ग्रामस्थांच्या वतीने या आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुकशेत गावातील भूखंड क्रमांक ५ येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये सकाळी ६ वाजता विठूरायाचा अभिषेक व पूजेनंतर हा एकादशी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी पूजेनंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांना दर्शन व फराळवाटप होणार आहे. दुपारी १२ वाजता व ३ वाजता भजन होणार असून, दारावे गावातील नागनाथ हरिपाठ भजनी मंडळाचा दुपारी साडेचार वाजता हरिपाठ तर सायंकाळी साडेपाच वाजता कुकशेत गावातील ग्रामस्थांचा हरिपाठ होणार आहे. सांयकाळी साडेसात वाजता मंदिरामध्ये भजन होणार आहे.
.................
वृक्ष छाटणीअभावी नागरिकांना धोका
जुईनगर, ता. ५ (बातमीदार) : नवीमुंबईत रखडलेली मॉन्सूनपूर्व कामे अद्याप मार्गी न लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत विविध ठिकाणांसह नेरूळ गावदेवी मंदिर परिसरातील मॉन्सूनपूर्व वृक्ष छाटणी न झाल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी वृक्ष अथवा त्याची फांदी पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेरूळ सेक्टर-१२ मधील गावदेवी मंदिर परिसरात असलेल्या झाडांची छाटणी न झाल्याने शालेय विद्यार्थी आणि पालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नेरूळ गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक प्रतिदिन या मंदिरात ये-जा करत असतात. मंदिराच्या उत्तर दिशेला तेरणा विद्यालय आणि पश्चिमेला एन. आर. भगत विद्यालय तसेच दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल आहे. त्‍यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची ये-जा सुरू असते. शिवाय सेक्टर १४, १६, १८ आणि २० कडे जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने अधिक वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते. त्यामुळे येथील मोठमोठ्या वृक्षाच्या फांद्या पडून अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पार्किंग समस्येअभावी परिसरातील अनेक वाहनेही त्या रस्त्यावर पार्क केलेली असतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तरी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या परिसरातील वृक्षांची छाटणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
..............
गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नेरूळ (बातमीदार) ः नेरूळ पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या नेरूळ सेक्टर-१६, १६ ए, १८, १८ ए मध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनातील एसी कॉम्प्रेसर व अन्य किंमती साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाहनांचे दरवाजे अथवा काचा फोडून आतील साहित्य चोरीला जात आहे. यामुळे परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्‍यामुळे परिसरात साध्या वेशातील पोलिस गस्त तातडीने वाढवून वाढत्या चोऱ्यांना अटकाव आणण्याची मागणी गणेश भगत यांनी पोलिसांकडे केली आहे. नेरूळ सेक्टर-१६ ए मधील त्रिमूर्ती भवन या इमारतीचा ताबा पूर्णपणे महापालिका प्रशासनाकडे आहे. ही इमारत आजमितीला पूर्णपणे बंद असून, तेथील सदनिकांमध्ये कोणीही निवासी वास्तव्य करत नाही. तथापि रहिवाशांनी सदनिका सोडल्यापासून या इमारतीचा ताबा गर्दुल्ले व अन्य व्यसन करणाऱ्यांनी घेतला आहे. चोविस तास हे घटक सोसायटी आवारात असतात. ही इमारत पूर्णपणे नागरी वस्तीत असल्याने इमारतीसभोवतालच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
..............
सानपाड्यात रविवारी अवतरणार पंढरीची वारी
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) ः आषाढी एकादशीनिमित्त सानपाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिपंढरपूर अवतरणार असून, दिंड्या, पालखी, भजनी मंडळे या वारीमध्ये सहभागी होणार आहेत. यंदा या पालखी, दिंडी सोहळ्याचे सहावे वर्ष आहे. समाजसेवक पांडूरंग आमले, साईभक्त सेवा मंडळ, साईभक्त महिला फाउंडेशन यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता सानपाडा सेक्टर-८ मधील गणपती मंदिरापासून या दिंडी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. सेक्टर-७ मधील शिवराज प्लाझा येथे या दिंडी सोहळ्याची समाप्ती होणार आहे. सानपाडा सेक्टर-२, ३, ७, ८ मधून हा दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यादेखील या दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या दिंडीमध्ये स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी होत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले वारकऱ्यांच्या वेशात या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. भजन मंडळी, शंभर ते सव्वाशे शालेय मुले, लेझिम पथके, टाळ पथक, राकेश नाईक ऑर्केस्ट्राचे कलाकार या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात. सुमारे तीन तास चालणाऱ्या या दिंडी सोहळ्यामध्ये अभंग, हरिपाठ होणार आहे. सानपाड्यामध्ये प्रतिपंढरपूर अवतरत असल्याचे चित्र निर्माण होणार आहे.
...........
फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्यावाटप
उरण, ता.(वार्ताहर) ः रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे, येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आल्या. विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे, लेखनिक नवनीत ठाकूर व उपशिक्षक दिगंबर पाटील यांच्या प्रयत्नातून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सुमारे तीन हजार वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मैनेजिंग कॉन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर हे दरवर्षी रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध शाळेत मोफत वह्यावाटप करीत असतात. त्यांचा लाभ फुंडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दरवर्षी होत असतो. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे, स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश म्हात्रे, दिलीप तांडेल, उप मुख्याध्यापिका एस. डी. थोरात, पर्यवेक्षिका एस. एम. बाबर यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील यांनी केले.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com