केडीएल बायोटेक कंपनी कामगारांचा आक्रोश
थकीत देणी मिळण्यासाठी कामगारांचा आक्रोश
केडीएल बायोटेक कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन
खोपोली, ता. ५ (बातमीदार) ः १२ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या केडीएल बायोटेक कंपनीतील २४० हून अधिक कामगारांना अद्यापही त्यांच्या हक्काची आर्थिक देणी मिळालेली नाही. या देणीसाठी कामगार व त्यांच्या युनियन प्रतिनिधींनी कामगार आयुक्त, न्यायालय, मंत्रालय व मंत्री स्तरावर पाठपुरावा केला, मात्र अद्यापही देणी मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कंपनीतील सर्व यंत्रसामग्रीसह २४ एकरच्या आसपास जमीन बँकेतर्फे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मदतीने त्यांचे नातेवाईक संकेत भासे व त्यांचे अन्य दोन भागीदार यांनी २२ कोटी रुपयांना विकत घेतली. हा व्यवहार पारदर्शकपणे झाला असल्याचा त्यांचा दावा आहे, तर यात थोरवे यांनी दबावतंत्र वापरून हस्तक्षेप केला असल्याचा आरोप कामगारांनी केला. संकेत भासे व त्यांच्या दोन भागीदारांकडून आता हीच जमीन एल ॲण्ड टी कंपनीला जवळपास १०४ कोटींना विकली आहे. मात्र, कामगारांची देणी देण्यासाठी चालढकल होत असल्याने बुधवारी (ता. ३) कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. या वेळी कामगारांनी थोरवे व संकेत भासे यांच्यावर दबाव तंत्र वापरून जमीन विकत घेतली आणि फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच थकीत देणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे कामगारांनी सांगितले.
या वेळी कामगार प्रतिनिधी प्रशांत गोपाळे, गजानन बैलमारे, बाळू बैलमारे यांच्यासह अन्य कामगारांनी कंपनी बंद, बेरोजगारी व देणी रखडल्याने कामगारांची झालेली दैना, आर्थिक व मानसिक परिस्थिती याची माहिती सर्वांसमोर मांडली. दरम्यान, न्यायालयाकडून देणीबाबतचे मंजूर विवरणपत्र कामगारांना प्राप्त झाले आहे. ही देणी देण्याची जबाबदारी मालमत्ता विकत घेतलेल्यांकडे आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कामगारांचा व प्रतिनिधींकडून केला जात आहे. दुसरीकडे जमिनी खरेदी-विक्री करणे हा आमचा व्यवसाय असून, तो आम्ही केडीएल कंपनी व संबंधित बँकेसोबत केला. त्यामुळे कामगारांच्या देणीबाबत कंपनी मालक, बँक व संबंधित शासकीय यंत्रणा यांच्याकडे कामगार व त्यांच्या प्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी भूमिका संकेत भासे व भागीदारांनी घेतल्याचे सांगितले आहे.
प्रत्येकी सात लाख रुपये देणी थकीत
२०१२-१३ या वर्षातील जून महिन्यात ही कंपनी तडकाफडकी बंद झाली. तत्कालीन व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यातील पगार वाढसंबंधित वाद झाल्याने ही कंपनी बंद केली. एकूण २४२ च्या आसपास कायमस्वरूपी कामगार बेरोजगार झाले. दोन कामगार युनियन असूनही मागील १२ वर्षे थकीत देणी मिळण्याची लढाई सुरू आहे. प्रत्येक कामगाराला साधारणपणे साडेसहा ते सात लाख रुपये नियमानुसार देणी मिळणे थकीत आहे.
फोटो ओळ,
खोपोली : केडीएल बायोटेक कंपनीच्या द्वारासमोर थकीत देणी मिळण्यासाठी कामगारांनी आंदोलन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.