जीओ टॅगिंगनिर्णयाविरोधात ठेकेदार आक्रमक
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेतील ठेकेदार युनियनच्या वतीने राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या जिओ टॅगिंग निर्णयाविरोधात शुक्रवारी (ता. ४) निदर्शने करण्यात आली. या वेळी जिओ टॅगिंग निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठेकेदारांनी केली असून, मुख्य कार्यकार अधिकारी नेहा भोसले यांना निवेदन दिले आहे.
राज्य सरकारकडून तीन जिल्ह्यांकरिता जिओ टॅगचा जीआर काढण्यात आला असून, त्यात रायगडचाही समावेश आहे. या प्रणालीचा बिल तयार करताना त्रास होणार असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडून अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याने यापूर्वीही, २४ जून रोजी ठेकेदार संघटनेकडून जिल्हा परिषदेला पत्र सादर करण्यात आले होते, परंतु आजतागायत ठेकेदार संघटनेच्या मागणीकडे रायगड जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही उत्तर अथवा चर्चेसंदर्भातील कार्यवाही झालेली नाही.
रायगड जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम आहे. या ठिकाणी इंटरनेट नसल्याने अनेकदा कामाचा खोळंबा होतो. त्यामुळे जिओ टॅग प्रणालीची अंमलबजावणी करणे शक्य होत नाही. वर्षभरापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे केली गेली आहेत. अजूनही अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, मात्र कोणत्याही कामाची बिले मंजूर करून ठेकेदारांना मोबदला रक्कम अदा केलेली नाही. कामे अपूर्ण राहिल्याने सरकार व ग्रामस्थांकडून ठेकेदारांवर दबाव आणला जातो, मात्र बिलांची रक्कमच अदा झाली नाही, तर कामे करणार कशी, असा प्रश्न ठेकेदारांनी या वेळी उपस्थित केला. त्यामुळे जिओ टॅगिंग ही सरकारी प्रणाली पुढील काही महिन्यांकरीता स्थगिती देऊन ठेकेदारांना बिले अदा करावीत, अशी आग्रही मागणी ठेकेदार संघटनेने या वेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.