महात्मा फुले महाविद्यालयासमोरील वाहतूक धोकादायक
महात्मा फुले महाविद्यालयासमोरील वाहतूक धोकादायक
अपघाताची शक्यता; गतिरोधक बसवण्याची मागणी
नवीन पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दोन्ही बाजूने गतिरोधक नाहीत, उड्डाणपुलाखालून वाहतूक करणेही धोकादायक झाले आहे. या रस्त्याच्या सर्व्हिस रोडची दुरुस्ती करावी, गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जनहित सामाजिक संस्थेतर्फे सचिन केणी यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्याने अनेक अवजड वाहने जातात. परिसरातील करंजाडे नोड, वडघर नोड आणि चिंचपाडा परिसरातील नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. या उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या पाण्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागतो. दोन्ही बाजूने अवजड वाहने वेगाने धावतात. रस्त्यावर गतिरोधक कुठेच नसल्याने अनेकदा अपघात होतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात, असे केणी यांनी म्हटले आहे.