उरण तालुका खड्ड्याच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
उरण तालुका खड्ड्याच्या विळख्यात
स्थानिक आमदारांसह प्रशासनाचे दुर्लक्ष
उरण, ता. ५ (वार्ताहर) ः तालुक्यातील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे पावसाळ्यात मोठे खड्डे पडल्याने संपूर्ण तालुका खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. भविष्यात या खड्ड्यांमुळे वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. उरण तालुक्यातील दास्तान-दिघोडे रस्ता, खोपटे-कोप्रोली, उरण-पनवेलच्या बोकडवीरा रस्त्यावर तर वाहन चालवणे अवघड बनले आहे.
उरण तालुक्यात सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचआय, जिल्हा परिषद या आस्थापनांच्या माध्यमातून रस्त्याचे जाळे विणले आहे. मात्र या रस्त्यांवर पावसाळ्यामुळे खड्डे पडले आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. सिडकोचे द्रोणागिरी नोडमधील आयओटीएल कंपनी ते नवघर, नवघर ते खोपटा पुलादरम्यानच्या मार्गाला भेंडखळ पेट्रोल पंप, खोपटा पूल, जेएनपीए हायवे ते कोस्टल रोड सर्कल, नवघर रेल्वे उड्डाणपूल तसेच द्रोणागिरी वसाहत मार्गावर खड्डे पडले आहेत. तसेच एनएचआयच्या जासई उड्डाणपूल, चिर्ले-दास्तान या रेल्वेपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
पर्यटकांचा खड्ड्यातून प्रवास
चिर्ले-दिघोडे, जासई-गव्हाण, खोपटा-कोप्रोली मार्ग खड्ड्याच्या विळख्यात सापडला आहे. दास्तान-दिघोडे हा रस्ता अटल सेतूला जोडतो. या सेतूवरून कोकणात येणारे अनेक आमदार या मार्गावरूनच जातात. शनिवार, रविवार तर हजारो पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मात्र या पर्यटकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. स्थानिक आमदारांनादेखील या रस्त्यांबाबत काही सोयरसुतक नसल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. खोपटे-कोप्रोली आणि दास्तान-रानसई या रस्त्यांची निविदा होऊन वर्ष उलटले तरी या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कामाचे घोडे नेमके कुठे आडले आहे, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.
खड्डे बुजविण्यात येतील
दास्तान-रानसई, खोपटे-कोप्रोली या दोन रस्त्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. कामाचा ठेकादेखील देण्यात आला आहे. मात्र वाढीव कामाला मंत्रालयातून मंजुरी मिळाली नसल्यामुळे वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत ठेकेदाराला ताबडतोब येथील खड्डे बुजविण्यास सांगितले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एन. डी. पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.