महिला व बालविकास मंत्रयांच्या जिल्हयात लाभार्थी वंचित
महिला व बालविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लाभार्थी वंचित
पिंक ई-रिक्षा योजनेत समावेश नसल्याने महिलांची रोजगाराची संधी हुकली
नवीन पनवेल, ता. ५ (बातमीदार) ः लाडकी बहीण योजनेनंतर शासनाने मोठा गाजावाजा करत पिंक ई-रिक्षा योजना आणली. या योजनेव्दारे विशिष्ट अनुदानावर महिलांना रिक्षा उपलब्ध करून दिल्या. रायगड जिल्ह्यात पनवेल, अलिबाग, कर्जत, खालापूर यासारख्या भागात महिला रिक्षाचालकांची संख्या जास्त असल्याने त्यांना या योजनेतून रोजगाराची संधी मिळेल, अशी आशा होती, मात्र ही योजना राज्यातील आठ जिल्ह्यांमध्येच सुरू करण्यात आल्याने त्यात रायगडचा समावेश नव्हता. यामुळे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच जिल्ह्याचा या योजनेत समावेश नसल्याने महिलांमधून रोष व्यक्त होत आहे.
होतकरू महिलांना पिंक रिक्षाच्या एकूण किमतीपैकी २० टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून, १० टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे. उर्वरित ७० टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध केली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून अर्ज मागविण्यात आले, मात्र फक्त आठ जिल्ह्यांत ही योजना असल्याने इतर महिलांची रोजगाराची संधी हुकणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले. तेथील पात्र ५० महिला लाभार्थ्यांना ई-रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली. नागपूरसोबतच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि अमरावती या आठ जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
इच्छुकांचे प्रस्ताव धूळखात
पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अनेक इच्छुक महिलांनी अर्ज केले. पनवेलमधून दीडशे महिलांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज नोंदवले. त्याची छाननी होऊन अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले, मात्र सध्या त्याबाबत कोणतीही कार्यवाही नसल्याने ते धूळखात पडून आहेत. वरिष्ठ पातळीवरून माहिती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना कळविले जाईल, असे पनवेल महापालिकेचे महिला व बालविकास अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
आमच्यापैकी बऱ्याच महिला पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत. भाड्याने रिक्षा घेऊन ती चालवणे परवडत नाही. रिक्षा विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही. या योजनेची घोषणा झाल्यानंतर थोडी आशा होती. आम्ही तसे प्रस्ताव तयार तयार केले, परंतु रायगड जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्याने महिलांची रोजगाराची संधी हुकली. आदिती तटकरेंनी त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
- आशा घालमे, महिला रिक्षाचालक पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.