बोरीवली भुयारीमार्गाच्या पाण्याचा प्रश्न मिटला

बोरीवली भुयारीमार्गाच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Published on

भुयारी मार्गाच्या पाण्याचा प्रश्न मिटला
मलप्रक्रिया केलेले पाणी निम्म्या दरात; पालिकेच्या तिजोरीतही येणार गंगाजळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे-बोरिवली हे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या भुयारी मार्ग प्रकल्पाला भेडसावणारा पाण्याचा प्रश्नही अखेर मार्गी लागला आहे. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी ठाणे महापालिका मलप्रक्रिया केंद्रातून पाणी पुरवणार आहे. त्यासाठी घरगुती वापरापेक्षा निम्म्या दरात म्हणजे प्रत्येक एक हजार लिटरमागे पावणेचार रुपये दर आकारणार आहे.

विशेष म्हणजे उद्यानासाठी वापरल्यानंतर उर्वरित प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडले जात होते; मात्र आता पाणी प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे. त्याद्वारे पालिकेला निधी मिळणार आहे. ठाणे- बोरिवली भुयारी मार्गाचे काम मुंबई महाप्रदेश विकास प्राधिकरण करत आहे. या कामाचा ठेका मे. मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करत आहे. या कामासाठी ठाण्यातील मानपाडा येथील निळकंठ वसाहतीजवळ आणि बोरिवडे मैदान येथे कास्टिंग यार्डचे काम हाती घेतले आहे.

निळकंठ कास्टिंग यार्डसाठी दररोज ७०० किलो लिटर, तर बोरिवडे कास्टिंग यार्डसाठी रोज ३०० किलोलिटर असे रोज किमान एक हजार किलो लिटर म्हणजे सुमारे १० लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. घरगुती वापरासाठी येणारे ठाणेकरांच्या हक्काचे पाणी प्रकल्पाला देता येणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले आहे. तसेच बोअरवेलमुळे भूजल पातळी कमी होत असल्याने या प्रकल्पासाठी पाण्याची उपलब्धता कुठून करायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

प्रकल्प पूर्ण होईपर्यंत लागणाऱ्या १० लाख लिटर पाण्याचा पुरवठा ठाणे महापालिकेने करावा, अशी मागणी संबंधित ठेकेदाराने केली होती. ठाण्यात आधीच पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने पालिकेने कोलशेत व नागलाबंदर मलप्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया होणारे पाणी देण्यास तयारी दर्शवली. या दोन्ही प्रकल्पांची पाहणी ठेकेदारामार्फत करण्यात आली. प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानंतर हे पाणी उचलण्याची तयारी दाखवली, पण नंतर या पाण्याच्या किमतीवरून घोडे अडले. पालिकेने सुरुवातीला घरगुती वापरासाठी लावलेले सात रुपये ५० पैशांचा दर लावला. हे पाणी परवडत नसल्याने त्यात सूट देण्याची मागणी केली.

पाण्याचा दर निश्चित
अखेर ही मागणी मान्य करत पालिका आता प्रक्रिया केलेले पाणी ठेकेदाराला तीन रुपये ७५ पैसे प्रति हजार लिटर या दराने देणार आहे. पालिकेच्या प्रशासकीय महासभेत हा ठराव मंजूर झाला आहे. पहिल्यांदाच प्रक्रिया केलेल्या पाण्याला भाव कोलशेत मलप्रक्रिया केंद्राची क्षमता १० दशलक्ष लिटर, तर नागलाबंदर मलप्रक्रिया केंद्राची क्षमता चार दशलक्ष लिटर इतकी आहे. या दोन्ही केंद्रांत प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा दर यापूर्वी निश्चित केला होता.

ठेकेदार उभारणार यंत्रणा
ठाणे पालिकेचे कोलशेत मलप्रक्रिया केंद्र हे निळकंठ कास्टिंग यार्डपासून दोन ते अडीच किमी अंतरावर आहे, तर नागला बंदर मलप्रक्रिया केंद्र हे बोरिवडे कास्टिंग यार्डपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. हे पाणी मलकेंद्रापासून ते कास्टिंग यार्डपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असणार आहे. त्यामुळे साठवणूक टाकी, पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी, पाणीउपसा करणारी यंत्रणा ठेकेदार उभारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com