बेलापूरमधील लॉजमधून १५ लाखांचे हेरॉईन जप्त

बेलापूरमधील लॉजमधून १५ लाखांचे हेरॉईन जप्त

Published on

नवी मुंबई (वार्ताहर) : अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी सीबीडी बेलापूर येथील सी-शोर लॉजमधील एका खोलीतून १५ लाख २८ हजार रुपये किमतीचे ३८.२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले. कारवाईत पंजाब येथून हेरॉईन घेऊन आलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून, इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सीबीडी बेलापूर येथील पाम बीच रोडवरील सी-शोर लॉजमधील खोली क्रमांक २१३ मध्ये दोन व्यक्ती हेरॉईनची विक्री करण्यासाठी आल्‍याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास छापा मारून परमजीत सिंग महिंदर सिंग (२९) व सुखविंदर दारा सिंग (३५) या दोघांना ताब्यात घेतले. तसेच एका फ्लॅस्‍टिक पिशवीमध्ये तब्बल १५ लाख २८ हजार रुपये किमतीचे एकूण ३८.२ ग्रॅम वजनाचे तपकिरी रंगाचे हेरॉईन सापडले.
दोघांची चौकशी केली असता, पंजाब येथून त्यांच्या मित्राकडून १०० ग्रॅम हेरॉईन नवी मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. नवी मुंबईतील मोनू व डिझेल या दोघांनी त्यांना अमली पदार्थ घेऊन बोलावल्याचे तसेच १०० ग्रॅमपैकी ३० ग्रॅम हेरॉईन मोनू आणि ३० ग्रॅम डिझेलने नेल्याचे दोघा आरोपींनी सांगितले. उर्वरित अमली पदार्थ मोनूच्या मदतीने विकणार असल्याचेही सांगितले.

तस्‍करीचे धागेदोरे पंजाबमध्ये
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील पंजाब येथील आरोपी तेजबीर, तसेच नवी मुंबईतील मोनू व डिझेल यांच्याविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com