अलिबाग-वडखळ महामार्गावरील कोंडी सुटणार
अलिबाग-वडखळ महामार्गावरील कोंडी सुटणार
चौपदरीकरणाच्या हालचाली सुरू; डांबरीकरणासाठी २२ कोटींचा निधी मंजूर
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) ः अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हा रस्ता अरुंद असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकही हैराण झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात नुकतीच यासंदर्भातील बैठक पार पडली. बैठकीत डांबरीकरणासाठी २२ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीदेखील पुढकार घेण्यात आला आहे. त्यामुळे अलिबागकरांची व पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेश बालदी, माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील उपस्थित होते. अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता. आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले.
केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन राज्य मंत्रालयाने यावर्षीच्या वार्षिक कार्यक्रमात या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. २२ कोटी १८ लाख रुपयांना या कामाचा ठेका देवकर अर्थमुव्हर्स या कंपनीला देण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर खड्डे भरण्यासाठी २८ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खड्डे भरणे आणि रस्ता दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होणार आहेत, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा प्रवास आता खड्डेमुक्त व वाहतूक कोंडीविरहित रस्त्यावरून होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
.................
कोट :
अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण हे कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अलिबाग हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख तालुका असून, पर्यटन, उद्योग आणि शेतीच्या दृष्टीने तो प्रचंड महत्त्वाचा आहे. वडखळ हा मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. सद्यःस्थितीत या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून, अपघातांचा धोका, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ वाढत आहे. हा रस्ता प्रकल्प केवळ भौगोलिक सुविधा निर्माण करणारा नसून, तो कोकणच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीस चालना देणारा ठरेल.
-आमदार महेंद्र दळवी, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.