जाहिरात फलकांसाठी वृक्षांवर घाला

जाहिरात फलकांसाठी वृक्षांवर घाला

Published on

पनवेल, ता. ७ (बातमीदार) ः हरित पनवेलचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या सामाजिक, खासगी संस्‍थांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. असे असताना दुसरीकडे शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेजवळ १६ झाडांची कत्तल करण्यात आल्‍याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. बेकायदा फलकबाजीवर थेट फौजदारी कारवाई करणाऱ्या पनवेल महापालिकेने तीन ते चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवून या प्रकरणातून हात झटकले आहेत.
एकीकडे पनवेल महापालिका वृक्षसंवर्धन त्याचबरोबर ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी हाक देत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. महामार्गालगत फलकाच्या आड येणाऱ्या त्याचबरोबर सिडकोने विक्री केलेल्या भूखंडावरील झाडांच्या बुंध्यावर घाव घातला जात आहे. याबाबत वृक्ष प्राधिकरण समिती कोणतेही पाऊल उचलताना दिसत नसल्‍याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.
पनवेल परिसरामध्ये सिडको महामंडळाने १९७०ला जमिनी संपादन केल्या. त्याअगोदर या ठिकाणी शेती, वनराई होती. विकासाच्या नावे याठिकाणी टोलेजंग इमारती उभ्‍या राहिल्‍या. रस्ते, उड्डाणपूल, त्याचबरोबर विविध पायाभूत सुविधांसाठी वृक्षतोड करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवन संपुष्टात आले. पर्यावरणाचा ऱ्हासामुळे परिसरात वायू, जल आणि स्थल प्रदूषण वाढत आहे. आता सिडको वसाहती पनवेल महापालिकेकडे वर्ग केल्या. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली; परंतु विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात हिरवाई संपुष्टात येत आहे. याबाबत पनवेल महापालिका, वनविभाग, सिडकोकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

बांधकाम व्यावसायिकांकडून वृक्षतोड!
पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर मोकळ्या भूखंडाची सिडकोने विक्री केली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्या जागेवर वेगवेगळ्या प्रजातीची झाडे पूर्वीपासून होते; परंतु संबंधित व्यावसायिकांनी वृक्षतोड करून इमारती उभारल्‍या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्‍यारित असल्‍याने वृक्षतोड करताना परवानगी घेणे आवश्यक आहे. त्या बदल्यात इतर ठिकाणी वृक्षरोपण केल्यानंतर येथे बांधकाम करण्यासाठी मुभा दिली जाते; परंतु असा कोणताही प्रकार सध्या शहरात दिसून येत नसल्‍याने वृक्ष प्राधिकरण समितीच्या कामावर नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त होत आहे.

फलकाआड येणाऱ्या झाडांची कत्तल!
पनवेल-शीव त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारलगत असणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. तेथे जाहिरात फलकांच्या आड येणाऱ्या वृक्षांवर विषप्रयोग करण्यात आला आहे. यामुळे शेकडो झाडे सुकून गेली आहेत.

पर्यावरणाचा समतोल ढासळला
ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली, त्‍याच १० प्रभागांमध्ये वृक्षघनता कमी असून संख्या अवघी ४,००२ इतकी आहे. या ठिकाणी गृहसंकुलासाठी बेसुमार वृक्षतोड झाली आहे. तसेच त्याबरोबरीने पुनर्लागवड झालीच नाही. त्यामुळेच या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळला असून परिसराचे तापमान तसेच प्रदूषण वाढले आहे. कळंबोली येथील प्रदूषणाची वाढलेली पातळी त्याचेच उत्तम उदाहरण आहे.

विकासाबरोबर वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. तसेच असलेल्या झाडांचे संगोपनही आवश्‍यक आहे. जाहिरात फलकांसाठी वृक्षतोड केली जात असेल तर अशा जाहिरात एजन्सीचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे.
- सुनील करपे, पर्यावरणप्रेमी, कामोठे

आयुक्त हरित पनवेलसाठी आग्रही
महापालिका आयुक्त मंगेश चितळे हे पनवेल हरित पट्टा व्हावा म्हणून आग्रही आहेत; परंतु प्रत्यक्षात वृक्ष प्राधिकरण व पर्यावरण विभाग निद्रिस्त असल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. गुन्हा घडल्यानंतर दखलपात्र गुन्हा दाखल करायलाही पालिका धजावत नाही. तसेच पालिकेच्या विधी विभागाचाही यासंदर्भात सल्ला घेतला जात नाही. त्‍यामुळेच शीव-पनवेल महामार्गावरील वृक्षतोड होत असल्‍याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com