मराठी माणसाच्या शक्तीचे विराट दर्शन

मराठी माणसाच्या शक्तीचे विराट दर्शन

Published on

मुंबईत मराठी माणसाच्या शक्तीचे विराट दर्शन
मराठी भाषेच्या जल्लोषाने वरळी दुमदुमली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वीस वर्षांपासून ज्या क्षणाची मराठी माणूस वाट पाहात हाेता, ताे क्षण अखेर शनिवारी आला. हा क्षण म्हणजे राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या मनाेमिलनाचा. हा ऐतिहासिक क्षण डाेळ्यात साठवण्यासाठी राज्यभरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह मराठी माणसांची शक्ती शनिवारी वरळी डाेम येथे एकवटली हाेती. येथे काेणताही राजकीय झेंडा नव्‍हता; हाेता ताे फक्त आणि फक्त मराठी भाषेचा जयघाेष आणि मराठी माणसाचा जल्लाेष. मराठीच्या मुद्द्यावर दोघे भाऊ एकत्र आल्याने मराठी माणसाचा ऊर भरून आला होता.

वरळी डाेम येथे सकाळी ९ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली हाेती. ठाकरे बंधू एकत्र आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण तसेच राज्याच्या विविध भागांतून बस भरून येथे लाेक आले हाेते. हिंदीसक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विरोध करून ५ जुलैला एकत्रित माेर्चाची घाेषणा केली; मात्र त्याआधीच हिंदीसक्तीवरून सरकारने माघार घेतल्याने मोर्चा रद्द झाल्याने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हाेते. या मेळाव्‍यासाठी डोमचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. पाऊस असूनही लोक येत होते. दोन भावांच्या फलकांनी डोमचा परिसर गजबजला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच परिणाम करणारा विजयी मेळावा ठरेल, असा विश्वास चर्चेतून स्पष्‍ट दिसला.

मेळावा ठरला ऊर्जास्राेत
मुंबईत आज केवळ मेळाव्याची चर्चा होती. मुंबईतील सर्व कार्यकर्ते झाडून मेळाव्यासाठी उपस्थित होते. मुंबईत सर्वत्र राज आणि उद्धव या दोन भावांच्या भाषणाचीच चर्चा होती. दोन्ही पक्षांसाठी आजचा मेळावा ऊर्जास्त्रोत ठरला.

दोन भावांची छबी
विजयी मेळाव्याचे मुंबईत सर्वत्र फलक लावण्यात आले होते. त्यात फक्त दोन भावांची छबी झळकत होती.

फलक आणि सेल्फी
डोमच्या परिसरात लावण्यात आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भव्य होर्डिंग हे आज सेल्फी पाॅइंट ठरले. कार्यकर्ते त्या ठिकाणी सेल्फी घेत होते. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी दिसत होती.

दोन भावांच्या भेटीचा ‘ताे’ क्षण
राज आणि उद्धव ठाकरे यांचे दुपारी सव्‍वाबाराच्या सुमारास व्यासपीठावर आगमन झाले. ठाकरे बंधूंच्या आगमनाच्या क्षणी डोममधील वीज बंद करण्यात आली होती आणि दाेघांवर प्रकाशझाेत ठेवण्यात आला हाेता. हा ऐतिहासिक क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उपस्थितांनी फ्लॅशलाइटसह व्हिडिओ घेतले, तेव्‍हा संपूर्ण सभागृह उजळून निघाले. मंचावर दाखल होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. हा भावुक क्षण टिपण्याचा माेह झाला नसता तरच नवल ठरले असते.

मराठी हाच अजेंडा
आजच्या मेळाव्यात कोणताही झेंडा नव्हता. मराठी हाच अजेंडा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा अधूनमधून दिल्या जात होत्या, तसतसा शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांत उत्साह संचारत होता.

गळाभेट अन्‌ हस्तांदोलन...
विजयी मेळाव्याच्या सुरुवातीला राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारली. विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र छायाचित्रे काढली. या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व्यासपीठावर आल्या. या वेळी आदित्य आणि अमित यांनीही मंचावर एकमेकांशी हस्तांदाेलन केले. आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंच्या शेजारी, तर अमित हे उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंना जवळ घेतले. हा क्षण उपस्थितांना भावुक करणारा हाेता.

विविध नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काॅ. प्रकाश रेड्डी, काॅ. अजित नवले, आमदार जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.
----------------
भाषिक वाद सुरू करून मराठी माणसांत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. दोन भावांची ही एकजूट याला उत्तर आहे. याचा आम्हाला फार आनंद आहे.
- दत्ता कदम, रत्नागिरी
------------
उद्धव आणि राज हे दोघे भाऊ एकत्र आल्याने मराठी माणसांना आनंद झाला आहे. आम्हीही त्याला अपवाद नाही. हे आधीच व्हायला हवे होते. पालिका निवडणुकीत दोन भाऊ एकत्र असतील तर चित्र बदलेल.
- समसुद्दीन अन्सारी, मुंबई
--------
मराठी माणूस एकवटला आहे. त्यामुळे पालिकेत सत्ता नक्की येणारच. दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसासाठी ही काळाची गरज आहे.
- चंद्रभागा शिंदे, शिवसेनेच्या ज्येष्‍ठ कार्यकर्त्या
---------
मराठी माणसांची एकजूट व्हावी असे सर्वांनाच वाटत होते. ती एकजूट झाली आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. मराठी माणसांच्या भवितव्यासाठी हे गरजेचे आहे.
- दत्ता परुळेकर, सायकलस्वार
--------
बालसैनिक समर्थ दिनेश अदावडे हा दोघे भाऊ एकत्र आल्याने प्रचारक बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com