भाईंदरमध्ये भोंदूबाबा अटकेत
भाईंदरमध्ये भोंदूबाबा अटकेत
भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : ‘भुताची बाधा झाल्याने जीव वाचविण्यासाठी काळी जादू करावी लागेल, असे सांगून लाखो रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबाला काशीगाव पोलिसांनी शुक्रवारी (ता.४) बेड्या ठोकल्या. या भोंदूबाबाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पालघर या ठिकाणी याच प्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
काशीमिरा येथील निराटकर यांनी याप्रकरणी काशीगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. निराटकर यांच्या शेजारी राहणाऱ्या अयोध्याप्रसाद गिरी याने निराटकर यांचा विश्वास संपादन करून निराटकर यांच्या पतीला भूतबाधा झाल्याने आठ दिवसांत त्यांचा मृत्यू होणार आहे. त्यांचा जीव वाचवायचा असेल व त्यांच्या भावाची दारू सोडवायची असेल तर तंत्रमंत्र व पूजा करावी लागेल, असे त्यांना सांगितले. या पूजेसाठी पाच लाख रुपये खर्च येईल. घरातील सोन्याचे दागिने एकत्र करून पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्याप्रमाणे निराटकर यांनी दोन लाख ७० हजार रुपये व घरातील सर्व महिलांचे एकूण ८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकत्रित केले आणि काळ्या कपड्यामध्ये बांधून अयोध्याप्रसाद यांच्याकडे दिले. त्यानंतर आरोपीने त्याची खोली ४५ दिवस बंद राहील, पुढची पूजा करण्याकरिता आपण गुरुस्थानी जाणार असून, खोलीमध्ये कोणीही प्रवेश करावयाचा नाही. ४५ दिवस झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी प्रकट होऊ, अशा भूलथापा देत तो सोने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाला. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निराटकर यांनी काशीगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी अयोध्याप्रसाद गिरी याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याला नवी मुंबईतील तुर्भे येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सुनीलकुमार पातीदास ऊर्फ अयोध्याप्रसाद असून, तो अयोध्याप्रसाद गिरी असे बनावट नाव धारण करून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी लोकांची अशीच फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.