मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा
जुलैमध्ये तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा
मुंबईकरांची १८२ दिवसांची पाण्याची चिंता मिटली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मे-जून महिन्यात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी याचवेळी केवळ ८.५९ टक्के साठा होता. हा जलसाठा पुढील १८२ दिवस पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.
गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच मे महिन्यात मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस झाला. तसेच जूनमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तलाव ५०.७५ टक्के भरल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांत मे महिन्यात पाऊस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात तलाव ५०.७५ टक्के भरल्याचे घडले नाही. मुंबईला १ ऑक्टोबरपासून वर्षभर पुरण्यासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या ५०.७५ टक्के म्हणजे ७,३४,५६२ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ८.५९ टक्के म्हणजे १,२४,३४३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये १७.६६ टक्के म्हणजे २,५५,६२२ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता.
---
तलाव क्षेत्रात पाऊस
तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत अप्पर वैतरणा तलावात ३८ मिमी, मोडक सागर तलावात ७८ मिमी, तानसा तलावात ५६ मिमी, मध्य वैतरणा तलावात ७० मिमी, भातसा तलावात ६२ मिमी, विहार तलावात २६ मिमी, तर तुलसी तलावात ५४ मिमी पाऊस झाला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.